अमेरिकेच्या राष्ट्रीय संरक्षण संस्थेच्या ‘टेहळणी’ कार्यक्रमास लोकाची व्यक्तिगत माहिती ‘टीपून’ फेसबुक मदत करत असल्याचा आरोप काही महिन्यांपूर्वी एडवर्ड स्नोडेन याने केला होता. आता कॅस्पस्र्की या सायबर सुरक्षेच्या क्षेत्रात सक्रिय असलेल्या कंपनीने फेसबुक व्यक्तिगततेवर घाला घालीत असल्याचा दावा केला आहे. विशेष म्हणजे, फेसबुकच्या अँड्रॉइड अॅप वापरणाऱ्या व्यक्तींची गोपनीय माहिती, एसएमएस फेसबुककडून तपासले जात आहेत, असा आरोप कॅस्पस्र्कीने केला आहे. फेसबुककडून मात्र याबद्दल कोणतीही प्रतिक्रिया मिळू शकलेली नाही.
वापरकर्त्यांची खातरजमा करणे हे फेसबुकचे उद्दिष्ट असते आणि त्यादृष्टीने एसएमएसद्वारे एक कोडही पाठविला जातो. मात्र यापुढे अँड्रॉइडवर फेसबुक अॅप डाऊनलोड करताना आपण नेमकी कशाकशाची परवानगी फेसबुकला देत आहोत याचे भान असू द्यावे, असे आवाहन ‘कॅस्पस्र्की’चे मुख्य संरक्षण संशोधक डेव्हिड एम यांनी केले आहे. विशेषत: एमएमएस पाहण्याची परवानगीही मागितली जात असून त्याबाबत फेसबुकला पुरेसे स्पष्टीकरण देता आलेले नाही. त्यातच या अॅपवर अशा स्वरूपाच्या परवानग्यांसाठी ‘ऑटोमेटिक’ असा शब्दप्रयोग योजला जात असल्याने त्यावर अनेकांनी आक्षेप घेतले आहेत.
अबब..
डिसेंबर, २०१३च्या आकडेवारीनुसार, भारतात सध्या ९ कोटी ३० लाख फेसबुक वापरकर्ते असून त्यापैकी साडेसात कोटी वापरकर्ते आपले अकाऊंट मोबाइलच्या माध्यमातून वापरत आहेत. तर जगभरात फेसबुक वापरणाऱ्यांची संख्या १ अब्ज २० कोटी आहे. ४ फेब्रुवारी २००४ रोजी मार्क झुकेरबर्ग याने फेसबुकची स्थापना केली होती. तरुणांना नजरेसमोर ठेऊन तयार केलेल्या या सोशल नेटवर्किंग साइटचा मंगळवारी दहावा वर्धापनदिन असून तरुणांना आकर्षून घेण्यासाठी नवीन क्लृप्ती जाहीर होण्याची शक्यता आहे.

अशी ठेवली जाते पाळत..
अँड्रॉइड मोबाइल फोनवर फेसबुकचे अॅप्लिकेशन डाऊनलोड करताना फेसबुककडून अनेक परवानग्या मागितल्या जातात. सध्याचे अद्ययावत अॅप डाऊनलोड करताना ‘एसएमएस वाचण्यासाठी’ही परवानगी मागितली जाते आणि ती दिल्यानंतरच हे अॅप आपल्याला वापरता येते. शिवाय तुम्ही तुमचा मोबाइल क्रमांक जर फेसबुकवर टाकला तर केवळ एक एसएमएस पाठवून आम्हाला तो क्रमांक तपासता येतो, असे समर्थनही फेसबुकमार्फत केले जात आहे. आता तर, फेसबुकतर्फे वापरकर्त्यांची दिनदर्शिका आणि वेळापत्रक तसेच काही गोपनीय माहिती ‘पाहण्याची’ परवानगीही मागितली जात आहे.