अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीदरम्यान फेसबुकवरील लाखो अमेरिकन नागरिकांची माहिती मिळवून त्याआधारे ‘केम्ब्रिज अ‍ॅनालिटिका’ या राजकीय विश्लेषक व सल्लागार कंपनीने डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाचा मार्ग सुकर केला. ही बाब उघड झाल्यानंतर मोठा गहजब उडाला. फेसबुकचा संस्थापक मार्क झकरबर्ग याने ‘आमची चूक झाली, यापुढे असे होणार नाही’ असे सांगत या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. पण खरेच झकरबर्ग म्हणतो त्याप्रमाणे यापुढे फेसबुकच्या वापरकर्त्यांची माहिती सुरक्षित राहिल का? तशी शक्यता कमीच दिसते.

जाहिरातींचा बाजार

फेसबुकशी जोडले गेलेले जगभरातील दोन अब्ज वापरकर्ते हे फेसबुकच्या उत्पन्नाचे स्रोत नाहीत, तर या वापरकर्त्यांच्या माहितीआधारे मिळणाऱ्या जाहिराती हा फेसबुकचे उत्पन्नाचा स्रोत आहे. फेसबुकच्या उत्पन्नातील ९८ टक्के महसूल जाहिरातींमधून मिळणारा आहे. २०१७च्या अखेरीस फेसबुकचे एकूण उत्पन्न १२.९७ अब्ज डॉलर इतके होते. त्यापैकी १२.७४ अब्ज डॉलरचे उत्पन्न जाहिरातींतून आलेले आहे. या जाहिराती केवळ फेसबुकवर कोटय़वधी वापरकर्ते आहेत म्हणून मिळत नाहीत, तर वापरकर्त्यांचा प्रत्येक बारीक तपशील जाणून घेऊन त्याद्वारे त्यांना आकर्षित करतील, अशा उत्पादनांच्या जाहिराती दर्शवण्याची संधी जाहिरातदारांना मिळते, म्हणून फेसबुकवर जाहिरातींचा मारा होतो.

 सारे काही आपल्या मंजुरीनेच..

आपली माहिती जाहिरातदारांना देण्याचे हे काम चोरून चाललेले नाही. आपल्या रीतसर परवानगीनेच फेसबुक हे करत आहे. आपल्या फेसबुकच्या प्रोफाइलवर नोंदवलेली माहिती, मित्रांची यादी, आपले लेखन, आपण तेथे प्रसिद्ध करीत असलेली छायाचित्रे, आपले लाइक्स या सर्वाचे ‘मार्केटिंग आणि प्रमोशन’ करण्यात येईल, या अटीवरच फेसबुकने आपणास त्यांच्या मंचावर घेतले आहे. त्यामुळे ‘आमची माहिती का विकता?’ हे विचारण्याचा हक्क आपण फेसबुकवर लॉगइन केले, त्या वेळीच गमावून बसलो आहोत. मात्र वापरकर्त्यांचा वापर करून उत्पन्न मिळविणारी फेसबुक ही एकमेव कंपनी नाही. या यादीत फेसबुक दुसऱ्या क्रमांकावर आहे. पहिला क्रमांक लागतो तो गुगलचा.

कारण, फेसबुकपेक्षा गुगलचे वापरकर्ते किंचित जास्त आहेत. पण त्याहीपेक्षा गुगलचे ‘अ‍ॅडसेन्स’ आणि ‘अ‍ॅडवर्ड्स’ हे, वापरकर्ते नेमके कशाच्या शोधात आहेत, हे जाणून घेऊन त्याआधारे जाहिराती दर्शवतात. म्हणजे तुम्ही संकेतस्थळावर मोबाइलचा शोध घेत असाल तर, त्यानंतर तुम्ही जेव्हा जेव्हा गुगलवर कशाचाही शोध घ्यायचा प्रयत्न कराल तेव्हा तुमच्या पडद्यावर मोबाइलच्या जाहिराती प्रामुख्याने दिसतील. फेसबुकचे जाहिरात तंत्रही असेच आहे आणि आजघडीला इंटरनेटवरील प्रत्येक व्यावसायिक संकेतस्थळ याच तंत्राने काम करते. ‘केम्ब्रिज अ‍ॅनालिटिका’ने हे तंत्र राजकीय प्रोपगंडासाठी वापरले.

केम्ब्रिज अ‍ॅनालिटिका आणि बिग डेटा

२०१६च्या अमेरिकी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीदरम्यान रिपब्लिकन पक्षाने उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रचारमोहिमेत केम्ब्रिज अ‍ॅनालिटिका ही कंपनीही सहभागी होती. ही ब्रिटनमधील ‘स्ट्रॅटेजिक कम्युनिकेशन लॅबरोटरी’ची (एससीएल) उपकंपनी. सरकार, सरकारी कंपन्या, राजकीय पक्ष यांच्यासाठी माहिती प्रसार आणि प्रचाराचे काम ही कंपनी करत होती. अमेरिकेतील सॉफ्टवेअर क्षेत्रातील एक अब्जाधीश रॉबर्ट मर्सर आणि त्यांची कन्या रिबेका यांचे बॅनन हे राजकीय सल्लागार होते. त्यांच्या सल्ल्याने मर्सर यांनी एससीएलमध्ये १५ अब्ज डॉलरची गुंतवणूक केली आणि त्यातूनच केम्ब्रिज अ‍ॅनालिटिकाचा जन्म झाला. या कंपनीने बिग डेटाकडे आपला मोर्चा वळवला. आपण दिवसभरात ज्या गोष्टी ऑनलाइन वा ऑफलाइन करत असतो, त्याची इत्थंभूत माहिती म्हणजे बिग डेटा. या सर्व माहितीचे पृथ्थकरण करून त्याआधारे एखाद्या व्यक्तीचे मानसशास्त्रीय चित्र तयार केले जाते. केम्ब्रिज अ‍ॅनालिटिकाच्या या कामात त्यांना केम्ब्रिज विद्यापीठातील एक रशियन-अमेरिकी शिक्षक अ‍ॅलेक्झांडर कोगेन याची मदत झाली. कोगेन याने ‘धिस इज माय डिजिटल लाइफ’ नावाचे एक अ‍ॅप तयार केले होते. व्यक्तिमत्त्व चाचणी करणारे हे अ‍ॅप फेसबुकवरून प्रसारित करण्यात आले. त्यातून मिळणाऱ्या माहितीचा वापर आपल्या शैक्षणिक कामासाठी वापर करायचा आहे, असे सांगून कोगेनने फेसबुककडून ती मिळवली. प्रत्यक्षात दोन लाख ७० हजार फेसबुक वापरकर्त्यांनीच या अ‍ॅपचा वापर केला. मात्र, अ‍ॅपसाठी लागणाऱ्या परवानग्यांमध्ये ‘कॉन्टॅक्ट अ‍ॅक्सेस’ अर्थात वापरकर्त्यांच्या संपर्क क्रमांकांची माहितीही उघड करण्याची अट होती. त्यामुळे या पावणेतीन लाख वापरकर्त्यांच्या माध्यमातून कोगेनला लाखो फेसबुक वापरकर्त्यांची माहिती मिळाली. तिचा वापर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत ट्रम्प यांच्या प्रचार मोहिमेत करण्यात आल्याचे आता उघड होत आहे.

अ‍ॅपद्वारे माहिती कशी मिळते?

फेसबुकवर अनेक अ‍ॅप कार्यरत असतात. तुमचे व्यक्तिमत्व जाणून घ्या, तुम्ही कोणत्या अभिनेता/अभिनेत्रीसारखे दिसता, ६० वर्षांनंतर तुम्ही कसे दिसाल, तुमचा स्वभाव कसा आहे अशा फुटकळ विषयांचे पण वापरकर्त्यांचे कुतूहल जागवणारे अ‍ॅप फेसबुकवर सक्रिय असतात. ते सुरू करताच त्यासाठी वापरकर्त्यांकडे वेगवेगळ्या परवानग्या मागितल्या जातात. यामध्ये वापरकर्त्यांची मूळ माहिती, त्यांच्या ‘फ्रेंडलिस्ट’ची यादी, त्यांच्या पोस्ट या सगळय़ा गोष्टी हाताळण्याची परवानगी मागितली जाते. वापरकर्त्यांना त्याचे गांभीर्य लक्षात येत नाही. ते मंजुरी देऊन मोकळे होतात. इथेच मोठा घोळ होतो. एकदा वापरकर्त्यांची माहिती हाताळण्यास मिळाली की संबंधित अ‍ॅप त्यांचीच नव्हे तर त्यांच्या यादीतील सर्व मित्रमंडळींची माहिती नोंदवून घेते. आणि तिचाच वापर आपल्या मेंदूवर ताबा मिळविण्यासाठी केला जातो.. अमेरिकेतील निवडणुकीत तेच घडले.

असिफ बागवान asif.bagwan@expressindia.com