फेसबुक या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या भारतातील पब्लिक पॉलिसी विभागाच्या प्रमुख अंखी दास यांनी राजीनामा दिला आहे. अंखी दास या ऑक्टोबर २०११ पासून फेसबुक इंडियासाठी काम करत होत्या. फेसबुकच्या आधी त्या भारतातील मायक्रोसॉफ्टमध्ये पब्लिक पॉलिसी हेड होत्या. जानेवारी २००४ मध्ये त्या मायक्रोसॉफ्टमध्ये रुजू झाल्या होत्या.

मुंबईवरच्या हल्ल्याला दहा वर्षे पूर्ण झाली तेव्हा अंखी दास यांचा एक लेख प्रसिद्ध झाला होता ज्याचं नाव होतं No Platform For Violence. हा लेख इंडियन एक्स्प्रेसमध्ये प्रसिद्ध झाला होता. कट्टरतवादाला प्रोत्साहन देणाऱ्या १ लाख ४० हजार पोस्ट आम्ही फेसबुकवरुन हटवल्याचं त्यांनी या लेखात म्हटलं होतं. त्यांच्या या लेखामुळे त्या चांगल्याच चर्चेत आल्या होत्या.

दरम्यान अमेरिकेतलं वर्तमानपत्र वॉल स्ट्रीट जर्नलमध्ये १४ ऑगस्टला एक रिपोर्ट प्रसिद्ध झाला होता. जगातली सर्वात मोठी सोशल मीडिया कंपनी जिच्याकडे व्हॉट्स अॅपचीही मालकी आहे त्यांनी भारतातील सत्ताधारी पक्ष असलेल्या भाजपासमोर शरणागती पत्करलेल्या आरोप वॉल स्ट्रीट जर्नलच्या लेखात करण्यात आला होता. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीआधी फेसबुकनं भाजपाशी संबंधित फेक पेजेस हटवल्याची माहिती अंखी दास यांनी दडवली असाही दावा या लेखात करण्यात आला होता.

अंखी दास यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये काय म्हटलं आहे?
मी फेसबुक सोडण्याचा निर्णय घेतला आहे. प्रदीर्घ कालावधी मी या कंपनीत घालवला आहे. मी २०११ मध्ये फेसबुक या कंपनीत रुजू झाले. देशातील इंटरनेटचा वापर आजच्या तुलनेत तेव्हा कमी होता. सामाजिक आणि आर्थिक विषमता कशा सोडवल्या जातील यादृष्टीने आणि लोकांना जोडण्याच्या उद्देशाने मार्गदर्शन केलं. मागील नऊ वर्षात मी हाती घेतलेलं हे मिशन काही प्रमाणात पूर्ण झालं आहे असं आज वाटतं आहे. कंपनीतील स्मार्ट आणि हुशार लोकांकडून मी खूप काही शिकले आहे. फेसबुक ही एक खास कंपनी आहे असंही त्यांनी म्हटलं आहे.