टीकाकारांना गप्प करण्यासाठी फेसबुकने एका जनसंपर्क आस्थापनेला काम दिल्याच्या बातम्या आल्यामुळे कंपनीचे प्रमुख मार्क झकरबर्ग यांनी कंपनीच्या अध्यक्षपदावरून पायउतार व्हावे अशी मागणी गुंतवणूकदारांनी केली आहे.

दी न्यूयॉर्क टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार फेसबुकने त्यांच्यावरील टीकाकारांना वेगवेगळ्या मार्गाने गप्प करण्याचा प्रयत्न करतानाच त्यांचा संबंध अब्जाधीश गुंतवणूकदार जॉर्ज सोरोस यांच्याशी जोडण्याचा प्रयत्न के ला. त्याचबरोबर जनक्षोभाची लाट इतर प्रतिस्पर्धी कंपन्यांवर उलटवण्याचा प्रयत्नही केला. फेसबुकने त्यांची मलिन झालेली प्रतिमा सुधारण्यासाठी डिफायनर्स पब्लिक रिलेशन्स या आस्थापनेला कंत्राट दिले होते.  २०१६ च्या अमेरिकी निवडणुकीत रशियाने हस्तक्षेप तसेच केंब्रिज अ‍ॅनॅलिटिकामुळे अडचणीत आल्यानंतर फेसबुकने जनसंपर्क आस्थापनेची मदत घेतली. अमेरिकी गुंतवणूकदार कंपनी ट्रिलियम अ‍ॅसेट मॅनेजमेंटचे उपाध्यक्ष जोनास क्रॉन यांची फेसबुकमध्ये ८.५ दशलक्ष पौंडाची गुंतवणूक असून काल रात्री त्यांनी झकरबर्ग यांना पायउतार होण्यास सांगितले. झकरबर्ग यांनी कंपनीच्या मंडळाचे अध्यक्षपद सोडावे अशी त्यांची मागणी आहे. फेसबुक ही कंपनी आहे त्यामुळे तिचे अध्यक्षपद व मुख्य कार्यकारीपद यावर वेगळ्या व्यक्ती असल्या पाहिजेत असे त्यांनी सांगितले.

फेसबुक दबावगट कंपन्यांची मदत घेत असून या सगळ्याचा आढावा घेण्याचा आदेश फेसबुकचे धोरण प्रमुख सर निक क्लेग यांना देण्यात आला आहे. त्यांची नियुक्ती गेल्या महिन्यात झाली आहे. डिफायनर्स या जनसंपर्क कंपनीने फेसबुकच्या टीकाकारांना व प्रतिस्पर्धी कंपन्यांना लक्ष्य केले होते. फेसबुक विरोधी गट हे गुंतवणूकदार सोरो यांच्याशी संबंधित आहेत अशा बातम्याही पत्रकारांच्या मार्फत देण्यात आल्या होत्या. जनसंपर्क आस्थापनेची मदत घेतल्याच्या आरोपाचा झकरबर्ग यांनी इन्कार केला असून हे समजताच आमच्या सहकाऱ्यांशी बोलून या आस्थापनेशी संबंध तोडले आहेत असे त्यांनी सांगितले.