आजच्या तरुण पिढीला ‘फेसबुक’ने अक्षरश: वेड लावले आहे. मात्र या फेसबुकचा अतिरिक्त वापर आणि कुतूहलापोटी फेसबुकचा चुकीचा वापर यामुळे एखाद्याचा जीव जाऊ शकतो, हे केरळमध्ये घडलेल्या दोन घटनांमध्ये दिसून येते. केरळमध्ये फेसबुकचा गैरवापर केल्याने दोन तरुणांचा हकनाक बळी गेला. रेल्वे ट्रॅकमध्ये उभे राहून चित्रीकरण करणाऱ्या एका अल्पवयीन मुलाला मागून येणाऱ्या रेल्वेगाडीने उडविले, तर दुसऱ्या घटनेत स्वत:च्या फाशीचे चित्रीकरण करताना एका तरुणाला गळफास बसला आणि त्याचा जीव गेला.
थ्रिसर येथे राहणारा एडविन हा १५ वर्षांचा मुलगा आणि त्याचे काही मित्र रेल्वे ट्रॅकवर मोबाइलद्वारे चित्रीकरण करत होते. एडविन रेल्वे ट्रॅकमध्ये उभा होता. आपल्या मागून भरधाव ट्रेन येत आहे, असे एडविनला दाखवायचे होते. मागून येणाऱ्या ट्रेनपुढे उभा असल्याचा व्हिडीओ तो फेसबुकवर टाकणार होता. छायाचित्र काढल्यानंतर एडविन रेल्वे ट्रॅकमधून बाहेर येणार होता. मात्र एडविन ट्रॅकच्या बाहेर होण्याआधीच वेगाने येणाऱ्या ट्रेनने त्याला उडविले. घाबरलेल्या त्याच्या मित्रांनी त्याला तात्काळ कूरकेनचेरी येथील रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
लुटुपुटीची फाशी सत्यात..
दुसऱ्या घटनेत, कायामकुलमजवळील एरूवा गावात राहणारा अभिलाष हा ३२ वर्षीय तरुण लुटुपुटुची फाशी घेत असताना स्वत:चे चित्रीकरण करत होता, मात्र त्याला खरोखरच गळफास बसला आणि त्याचा जीव गेला. सध्या फेसबुकवर फाशी घेण्यासंबधी अनेक व्हिडीओ प्रसारित करण्यात येतात. अनेक जण फाशी घेण्याचे नाटक करत स्वत:चा व्हिडीओ काढतात आणि त्याचे चित्रीकरण फेसबुकवर प्रसिद्ध करतात. अभिलाषने काही दिवसांपूर्वी असाच एक व्हिडीओ फेसबुकवर टाकला होता. हा व्हिडीओ पाहून त्याच्या एका मित्राच्या वडिलांनी त्याला अशा प्रकारचे व्हिडीओ प्रसिद्ध करू नको म्हणून तंबी दिली होती. अखेर अशा प्रकारच्या व्हिडीओनेच त्याचा बळी गेला.