आत्महत्या वेळीच रोखल्या जाव्यात यासाठी फेसबुक पुढे सरसावले आहे. फेसबुकने आत्महत्या प्रतिबंधक (सुसाईड प्रिव्हेंन्शन) असे एक नवे टूल विकसित केले असून, हे टूल नुकतेच भारतात लाँच करण्यात आले. धकाधकीच्या जीवनात सध्या प्रत्यक्षात होणाऱया गाठीभेठी आता फेसबुकसारख्या सोशल मीडियाच्या माध्यमांमध्ये होतात. सोशल मीडिया हाच नेटिझन्सचा खरा दोस्त होऊ लागला आहे. सोशल मीडियावरच नेटिझन्स आपल्या मनातील भावना वेळोवेळी व्यक्त करत असतात. फेसबुकवर मेसेज टाकून आत्महत्या केलेली अनेक प्रकरणे देखील देशात समोर आली होती. त्यामुळेच फेसबुकने पुढाकार घेऊन ‘सुसाईड प्रिव्हेंन्शन’ हे नवे टूल भारतात दाखल केले.

ज्या व्यक्ती तणावात आहेत, अशा व्यक्ती आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलण्यापूर्वी काही पोस्ट टाकत असतील तर त्या पोस्टचा अंदाज घेऊन हे टूल मित्रपरिवाराला नोटिफिकेशन पाठवते. फेसबुक यूजरच्या पोस्टमध्ये काही विपरीत दिसल्यास ते कळविण्याची सोय या टूलमध्ये करण्यात आली आहे.

दरम्यान, हे टूल अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि ब्रिटनमध्ये याआधीच सुरू करण्यात आले होते. फेसबुकच्या या टूलला या देशांत चांगला प्रतिसाददेखील मिळाला. फेसबुक यूजरच्या पोस्टची काळजी घेणाऱया जगभरात आमच्या अनेक टीम्स नियुक्त करण्यात आलेल्या असून, त्या दिवसरात्र काम करत असतात. आत्महत्येला प्रवृत्त झालेल्यांच्या पोस्टची माहिती घेऊन त्यांना रोखण्यासाठीची मदत पोहोचविण्याचे काम या टीम्स करत असतात, असे फेसबुकने जाहीर केलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. फेसबुकने हे टूल भारतात ‘एएएसआरए’ आणि ‘द लाइव्ह लव्ह लाफ फाऊंडेशन’ या स्थानिक कंपन्यांच्या मदतीने सुरू केले आहे.