अनेकदा एखाद्या सोबतचे नाते संपते, मात्र त्याच्यासोबत काढण्यात आलेले फोटो मोबाईल किंवा कॉम्प्युटरमध्ये कायम असतात. माजी प्रियकर किंवा प्रेयसीने खासगी फोटो डिलीट केले नसतील, तर मग या फोटांचा वापर बदला घेण्यासाठी किंवा बदनामी घेण्यासाठी केला जातो. मात्र आता फेबसुककडून अशा प्रकारांना आळा घातला जाणार आहे. यासाठी नवे ‘आर्टिफिशियल इंटलिजन्स टूल’ सुरु करण्यात येणार असल्याची माहिती फेसबुकचा संस्थापक मार्क झकरबर्गने दिली आहे.

अनेकदा नातेसंबंध संपुष्टात आल्यावर खासगी फोटोंचा वापर करुन प्रियकर किंवा प्रेयसीची बदनामी केली जाते. या ‘रिव्हेंज पॉर्नला’ रोखण्यासाठी पावले उचलण्यात येणार असल्याचे झकरबर्गने म्हटले आहे. ‘ते (खासगी छायाचित्रे टाकणे) चुकीचे आहे. ते दु:खद आहे. तुम्ही आम्हाला त्याची माहिती दिल्यास आम्ही आर्टिफिशियल इंटलिजन्सचा आणि इमेज रेकगनेशनचा वापर करुन हा प्रकार रोखू. त्यामुळे खासगी आणि आक्षेपार्ह छायाचित्रे फेसबुकवर शेअर केली जाऊ शकणार नाहीत,’ अशी पोस्ट मार्क झकरबर्गने केली आहे.

अनेकदा नातेसंबंध संपुष्टात आल्यावर खासगी फोटोंच्या माध्यमातून ब्लॅकमेलिंग करण्यात येते किंवा ते फोटो फेसबुकवर प्रसिद्ध केले जातात. बदला घेण्याच्या किंवा बदनामी करण्याच्या उद्देशाने अशा प्रकारची कृती करण्यात येते. याचा सर्वाधिक त्रास महिलांना होतो. या त्रास रोखण्यासाठी बुधवारी आर्टिफिशियल इंटलिजन्स टूलचा वापर करणार असल्याची घोषणा केली.

यापुढे फेसबुकवर एखाद्या व्यक्तीसोबतचे किंवा व्यक्तीचे खासगी आणि आक्षेपार्ह फोटो टाकण्याचा प्रयत्न झाल्यास प्रशिक्षित सदस्याकडून त्या फोटोंचा आढावा घेतला जाईल. हा प्रशिक्षित सदस्य कम्युनिटी स्टँडर्ड टिमचा भाग असेल. प्रशिक्षित सदस्याने आक्षेपार्ह फोटो पाहिल्यावर तो काढून टाकण्यात येईल आणि त्याचे फेसबुक अकाऊंट बंद करण्यात येईल, अशी माहिती फेसबुकचे ग्लोबल सेफ्टी हेड अँटिगोन डेव्हिस यांनी दिली.