थायलंड सरकाराविरुद्ध खटला दाखल करण्यासंदर्भात आम्ही विचार करत असल्याचे फेसबुकने मंगळवारी स्पष्ट केलं आहे. थायलंडमधील सरकारने १० लाख लोकांचे फेसबुक अकाऊंट ब्लॉक केले आहेत. या गटाने थायलंडच्या राजावर टीका केल्याने सरकारने ही कारवाई केल्याचे सांगितले जात आहे. मात्र सरकारच्या या कारवाईविरोधात फेसबुक आता थेट कायदेशीर लढाई लढण्याच्या तयारीत असल्याने सीएनएनने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.

जगातील सर्वात मोठा सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्म असणाऱ्या फेसबुकवरील १० लाख लोकांची अकाऊंट थायलंड सरकारने ब्लॉक केली आहेत. यापूर्वी सरकारने रॉयलिस्ट मार्केट ग्रुप नावाने ओळखल्या जाणाऱ्या या गटाला कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला होता. मात्र तरीही या गटाने थायलंडमधील राजासंदर्भातील मजकूर सोशल नेटवर्किंगवरुन हटवण्यास नका दिला होता.

थायलंड सरकाने अखेर या गटाशी संबंधित १० लाख लोकांचे फेसबुक अकाऊंट बॅन केले. या कारवाईनंतर रॉयटर्सशी बोलताना फेसबुकच्या प्रवक्त्यांनी थायलंड सरकारच्या निर्णयावर टीका केली. सरकारने अशाप्रकारे लोकांवर बंदी घालणे चुकीचं आहे. हे आंतरराष्ट्रीय मानवाधिकार कायद्याचे उल्लंघन आहे. सरकारने लोकांना दिलेला इशारा हा त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणण्याचा प्रकार आहे, अशा शब्दांमध्ये प्रवक्त्यांनी फेसबुकची बाजू मांडली.

आम्ही इंटरनेट वापरणाऱ्यांच्या अधिकारांसाठी काम करतो. आता थायलंड सरकारने कायदेशीर लढाई लढण्याची तयारी करावी असं फेसबुकच्या प्रवक्त्यांनी म्हटलं आहे. मात्र फेसबुक यासंदर्भात नक्की काय करणार आहे याबद्दलची माहिती प्रवक्त्यांनी दिली आहे. थायलंडमधील कायद्यानुसार राजाचा अपमान करणे गुन्हा मानला जातो.

सरकारविरोधात आंदोलन करणाऱ्या नऊ लोकांना काही दिवसांपूर्वीच थायलंड पोलिसांनी अटक केली होती. २० ऑगस्ट २०२० रोजी अटक करण्यात आलेल्या लोकांमध्ये थायलंडमधील सामाजिक कार्यकर्ते एनन नाम्पा यांचाही समावेश होता. पेशाने वकील असणाऱ्या एनन यांच्यावर पोलिसांनी आंदोलकांचे नेतृत्व केल्याचा आरोप लावला आहे. देशातील राजव्यवस्थेविरोधात आवाज उठवल्याचा आरोपही त्यांच्यावर लावण्यात आला आहे. सध्या थायलंडमध्ये राजेशाहीविरोधात हजारो तरुण रस्त्यावर उतरुन आंदोलन करताना दिसत आहेत.