सोशल नेटवर्कच्या जालात अग्रस्थानी असलेल्या फेसबुकने आपल्या नेटवर्किंग साईटवर दहा लाख सक्रिय जाहिरातदारांचा टप्पा पार केला. गेल्या २८ दिवसांची आकडेवारी पाहता दहा लाखाहून अधिक कंपन्यांनी आपली आर्थिक वाटचाल वाढण्यासाठी व कंपनीच्या नफ्यात वाढ होण्याच्या दृष्टीने सोशल नेटवर्कच्या जालात कंपनीची जाहीरात करण्यासाठी फेसबुकला प्राधान्य दिले आहे.
या दहा लाख जाहीरातदारांमध्ये मुख्यत्वे लघु-जाहिरातदारांचा जास्त समावेश आहे. फेसबुकच्या संचालकांना या आकड्यात आणखी भर पडण्याची आशा आहे. अगदी, ज्वेलरी विक्रेत्यांपासून ते कपड्यांच्या दुकानांपर्यंत अशा सोळा लाखांहून अधिक लघु-जाहिरातदार फेसबुकला प्राधान्य देण्याची आशा संचालकांनी व्यक्त केली आहे.
लहान-जाहिरातदारांना फेसबुकवर जाहिरातीसाठी येणाऱ्या खर्चाचा अचूक आकडा समजू शकला नसला तरी, ‘ई मार्केटर’ या मार्केट रिचर्स संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, २०१२ या वर्षात अमेरिकेतील लहान-जाहिरातदारांनी फेसबुकवर जाहिरातीसाठी ३२०० कोटी खर्च केले असल्याचे म्हटले आहे.