भाजप नेत्याच्या द्वेषमूलकमजकुरावर कारवाईस नकार

लोकसत्ता विशेष प्रतिनिधी/ दी इंडियन एक्स्प्रेस

नवी दिल्ली : भाजपनेत्याच्या द्वेषमूलक मजकुराकडे ‘फेसबुक’ने हेतुपुरस्सर दुर्लक्ष केल्याचे वृत्त अमेरिकेतील ‘वॉल स्ट्रीट जर्नल’ वृत्तपत्राने प्रसिद्ध केल्यानंतर देशात राजकीय वादंग निर्माण झाला आहे. काँग्रेस आणि भाजपने रविवारी परस्परांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या, तर संसदेची माहिती-तंत्रज्ञान विषयक स्थायी समिती या प्रकरणी फेसबुककडे स्पष्टीकरण मागणार आहे.

काँग्रेसचे खासदार आणि संसदेच्या माहिती-तंत्रज्ञान विषयक स्थायी समितीचे अध्यक्ष शशी थरूर यांनी, आपण या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून या संदर्भात स्थायी समिती ‘फेसबुक’कडे स्पष्टीकरण मागणार आहे, असे सांगितले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार समिती सोमवारीच फेसबुककडे स्पष्टीकरण मागणार असून या समाजमाध्यमाला समन्सही पाठवले जाण्याची शक्यता आहे.

‘वॉल स्ट्रीट जर्नल’ने ‘फेसबुक हेट स्पीच रूल्स कोलाइड विथ इंडियन पॉलिटिक्स’ या शीर्षकाखाली सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले आहे. त्यात ‘फेसबुक-इंडियाने भाजप नेत्यांची प्रक्षोभक भाषणे आणि आक्षेपार्ह मजकूर नियमांनुसार काढून टाकले नाहीत. फेसबुकसाठी भारत ही सर्वात मोठी बाजारपेठ असून सत्ताधारी पक्षाला दुखावल्यास कंपनीच्या व्यावसायिक हितावर विपरित परिणाम होईल, या भीतीपोटी भाजपनेत्यांचा विद्वेषीमजकूर आणि भाषणांकडे दुर्लक्ष केले, असे म्हटले आहे.

भाजपचे तेलंगणमधील आमदार टी. राजा सिंह यांच्या अल्पसंख्यांकांविरोधातील कथित िहसात्मक मजकूरप्रकरणी फेसबुकच्या भारतातील धोरण संचालक आँखी दास यांनी दखल घेणे आवश्यक होते. परंतु त्यांनी मात्र त्याकडे दुर्लक्ष करीत, ‘भाजपनेत्यांच्या द्वेषमूलक पोस्टवर कारवाई केल्यास भारतातील व्यवसायास धक्का बसू शकतो, असे  फेसबुकच्या अन्य कर्मचाऱ्यांना सांगितले, असे ‘वॉल स्ट्रीट जर्नल’ने वृत्तात म्हटले आहे. भाजपनेत्यांबाबत आँखी दास यांनी घेतलेली भूमिका सत्ताधारी भाजपला व्यापक अर्थाने लाभदायक होती, असे फेसबुकच्या कर्मचाऱ्यांचे म्हणणे असल्याचेही या वत्तात नमूद केले आहे.

‘वॉल स्ट्रीट जर्नल’चे मूळ वृत्त ट्वीट करत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅपवर नियंत्रण ठेवतात. तसेच खोटय़ा बातम्या पसरवून मतदारांवर प्रभाव पाडतात, असा आरोप काँग्रेसनेते राहुल गांधी यांनी केला.

काँग्रेसच्या या आरोपांना केंद्रीय माहिती व तंत्रज्ञानमंत्री रवीशंकर प्रसाद यांनी तातडीने प्रत्युत्तर देताना काँग्रेसला केम्ब्रिज एॅनॅलिटिकाच्या माहितीसंच (डाटा) घोटाळ्याची आठवण करून दिली. स्वपक्षीयांवरही प्रभाव पाडण्याची क्षमता नसलेले पराभूत (राहुल गांधी) साऱ्या जगावर भाजप आणि संघाचा कब्जा असल्याचे रडगाणे गात आहेत, अशी टीका प्रसाद यांनी केली.

लंडनमधील माहितीसंच-विश्लेषक कंपनी केम्ब्रिज एॅनॅलिटिकाने फेसबुक खात्यांच्या वैयक्तिक माहितीचा वापर २०१६च्या अमेरिकेतील अधक्षीय निवडणुकीत करून डोनाल्ड ट्रम्प यांना लाभ मिळवून दिला होता. त्याची कबुली देताना ‘केम्ब्रिज एॅनॅलिटिका’ने काँग्रेसलाही गेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत मदत केल्याचा दावा केला होता. त्याचा उल्लेख करत प्रसाद यांनी काँग्रेसवर टीकेचा भडीमार केला. केम्ब्रिज एॅनॅलिटिका आणि फेसबुकचा निवडणुकसाठी हत्यार म्हणून तुम्ही (काँग्रेस) गैरवापर केला, रंगेहात पकडलेही गेला आणि तरीही तुम्ही भाजपवर आरोप करण्याचे धाडस दाखवत आहात, अशी टीका प्रसाद यांनी केली. माहिती आता सगळ्यांना उपल्बध होत असून तिचे लोकशाहीकरण झाले आहे. माहिती फक्त एखाद्या घराण्यापुरती मर्यादित राहिलेली नाही. ही बाब काँग्रेसला टोचू लागली असल्याचेही ट्विट प्रसाद यांनी केले.

वृत्तात काय? 

’भाजपनेते टी. राजा सिंह यांनी फेसबुकवर आणि जाहीरपणेही रोहिंग्या मुस्लीमांना गोळ्या घातल्या पाहिजेत असे म्हटले होते.

’ मुस्लीम देशद्रोही आहेत, मशिदी उद्ध्वस्त केल्या पाहिजेत, असेही ते म्हणाले होते. त्यांच्या या पोस्टला फेसबुक कर्मचाऱ्याने विरोध करून ती पोस्ट कंपनीच्या नियमांचे उल्लंघन करणारी असल्याचे म्हटले होते.

’परंतु भाजपच्या नेत्यांच्या पोस्टवर कारवाई केल्यास कंपनीच्या व्यावसायिक हिताला बाधा येऊ शकते, अशी भूमिका ‘फेसबुक’च्या धोरण संचालक आँखी दास यांनी घेतली होती.

भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भारतात फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅपवर नियंत्रण ठेवतात. खोटय़ा बातम्या पसरवून मतदारांवर प्रभाव पाडतात. अखेर अमेरिकी वृत्तपत्राने हे सत्य उघड केलेच.

– राहुल गांधी, नेते, काँग्रेस

स्वपक्षीयांवरही प्रभाव पाडण्याची क्षमता नसलेले पराभूत (राहुल गांधी) साऱ्या जगावर भाजप आणि संघाचा कब्जा असल्याचे रडगाणे गात आहेत. काँग्रेसला केम्ब्रिज अ‍ॅनालिटिकाचा माहितीसंच घोटाळा स्मरतो का?

      – रवीशंकर प्रसाद,  माहिती व तंत्रज्ञानमंत्री