वॉशिंग्टन : फेसबुकने वापरकर्त्यांच्या खासगी माहितीचा गैरवापर करणारी दोनशे उपयोजने काढून टाकली आहेत. केंब्रिज अ‍ॅनॅलिटिका या राजकीय सल्लागार आस्थापनेने ८७ दशलक्ष फेसबुक वापरकर्त्यांची माहिती चोरली होती, त्याबाबत चौकशी सुरू असून, त्या वेळी या माहितीचा वापर डोनाल्ड ट्रम्प यांच्या २०१६ मधील प्रचाराच्या वेळी करण्यात आला होता. चौकशी वेगात सुरू असल्याचे फेसबुकचे उत्पादन भागीदारी उपाध्यक्ष इमी आर्चिबोंग यांनी सांगितले. ज्या उपयोजनांनी माहितीचा गैरवापर केला ती काढून टाकण्यात येत असून त्यांच्यावर बंदी घालण्यात येत आहे. वापरकर्त्यांनाही बंदी घातलेल्या उपयोजनांची माहिती देण्यात येणार आहे. केंब्रिज अ‍ॅनॅलिटिका प्रकरणामुळे फेसबुकने माहिती गैरवापराची चौकशी सुरू केली आहे. त्यात व्यक्तिगत माहिती कशी वापरली गेली, ती कशी मिळवण्यात आली या सर्व अंगांनी विचार सुरू आहे. २०१४ मध्येच फेसबुकने धोरणात बदल करून काही उपयोजने म्हणजे अ‍ॅप्सना खासगी माहितीचा वापर करण्यास बंदी केली होती तरीही काही उपयोजने माहितीचा वापर करीत होती. लोकांच्या माहितीचा गैरवापर करणारी सर्व उपयोजने शोधून काढण्याचे काम सुरू आहे. केंब्रिज अ‍ॅनॅलिटिका प्रकरणात बाहेर आलेल्या माहितीमुळे होणाऱ्या परिणामांचा विचार फेसबुकचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्कझकरबर्ग यांनी गेला महिनाभर केला आहे.