देशात करोनाचा प्रसार झाल्यानंतर सरकारकडून वारंवार गर्दी टाळून घरपोच वस्तू पुरवण्याचं आवाहन सरकारकडून केलं जात आहे. ई-कॉमर्स कंपन्यांसाठी ही गोष्ट शक्य असली, तरी छोट्या व्यावसायिकांसाठी ही कठीणच आहे. मात्र, लॉकडाउनच्या काळात फेसबुकनं छोट्या व्यावसायिकांसाठी नवी संधी घेऊन आलं आहे. फेसबुक आणि इन्स्टाग्रामच्या माध्यमातून छोट्या विक्रेत्यांना वस्तुंची विक्री करता येणार आहे. अमेरिकेत ही सेवा सुरू करण्यात आली असून, लवकरच भारतातही सुरू होणार आहे.

करोनामुळे जगातील चित्रच बदलून गेलं आहे. सगळीकडं भीतीचं सावट असून, भारतातील स्थितीही काहीशी अशीच आहे. लॉकडाउनमुळे मागील दीड महिन्यापासून सगळे व्यवहार ठप्प असल्यानं अर्थचक्र ठप्प झालं होतं. आता हळूहळू लॉकडाउन शिथिल केला जात असला, तरी गर्दी टाळण्याचं आणि होम डिलिव्हरी सारख्या पर्यायांचा अवलंब करण्याचं आवाहन सरकारनं केलं आहे. या परिस्थितीत फेसबुक छोट्या विक्रेत्यांच्या मदतीला फेसबुक धावून आलं आहे.

फेसबुकचे सीईओ मार्क झुकेरबर्गनं एक पोस्ट लिहून याविषयी माहिती दिली आहे. “करोनामुळे निर्माण झालेल्या आर्थिक अस्थिरतेतून बाहेर पडण्यासाठी छोटे दुकानदार वा व्यावसायिक प्रयत्न करत आहेत. घरी राहुन सुरक्षित राहण्याचं आवाहन केलं जात आहे. त्याचबरोबर कोट्यवधी लोकांना त्यांची नोकरी गमवावी लागली आहे. त्यामुळे ऑनलाईन व्यवसाय ही गोष्ट सध्या खूप महत्त्वाची आहे, असं झुकेरबर्ग यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

फेसबुक शॉप्स म्हणजे काय?

फेसबुकनं आता वस्तुंची ऑनलाईन खरेदी विक्री सुरू करण्याच्या योजनेवर काम सुरू केलं आहे. ही सेवा अमेरिकेत सुरू झाली आहे. फेसबुकबरोबरच इन्स्टाग्रामवरही ही सुविधा उपलब्ध असणार आहे. फेसबुक शॉप्स प्रामुख्यानं छोट्या व्यावसायिकांसाठी असणार आहे.

छोट्या व्यावसायिकांना फेसबुक शॉप्सच्या माध्यमातून त्यांच्याकडील वस्तुंचा कॅटलॉग तयार करता येईल. ज्यामुळे ग्राहकांना पेजवरती सर्व वस्तू दिसतील. ग्राहक या वस्तुंची निवड करून खरेदी करू शकणार आहे. यासाठी कोणत्याही साईट वा अॅपची गरज असणार नाही. विशेष म्हणजे विक्रेते ग्राहकांना व्हॉट्स अॅप, मेसेंजर आणि इन्स्टाग्रामच्या माध्यमातून माहिती देऊ शकतील. फेसबुक शॉप्स ही सुविधा विनामूल्य असणार आहे.