फेसबुकने बुधवारपासून व्हिडीओ जाहिरात सेवा सुरू केली असून, न्यूज फीड्समध्ये जाऊन जेव्हा वापरकर्ते प्लेवर क्लिक करतील तेव्हा या जाहिराती दिसू शकतील. जर कुणाला फेसबुकवर १८ ते ५४ वयोगटासाठी जाहिरात द्यायची असेल तर त्यासाठी दिवसाला २० लाख अमेरिकी डॉलर मोजावे लागतील.
सोशल नेटवर्किंगमध्ये आघाडीवर असलेल्या फेसबुकने जाहिरातीच्या या नव्या तंत्राची चाचणी या आठवडय़ात डायव्‍‌र्हजट या नवीन फिल्मच्या मदतीने घेतली. फेसबुकच्या ब्लॉगपोस्टवर म्हटले आहे, की सप्टेंबरपासून आम्ही फेसबुकवर लोकांना खिळवून ठेवण्यासाठी व्हिडीओची चाचणी घेत होतो व त्यामुळे आम्हाला लोकांचा प्रतिसाद नेहमीपेक्षा दहा टक्क्यांनी अधिक मिळाला. आता हाच व्हिडीओ आकृतिबंध आम्ही जाहिरातदारांना उपलब्ध करून देत आहोत. व्हिडीओ जाहिराती या मोबाइल, लॅपटॉप व डेस्कटॉप संगणकावरही फेसबुक सुरू करताच दिसतील. स्मार्टफोन व टॅब्लेटमध्ये या जाहिराती पाश्र्वभूमीला दिसतील, त्याचे कारण वापरकर्त्यांच्या माहितीच्या डाऊनलोडला त्यामुळे धक्का लागणार नाही. फ्रेंड्स किंवा व्हेरीफाइड पेजेसवर आदानप्रदान केलेल्या व्हिडीओप्रमाणे यातही या जाहिराती आवाजाविना दिसतील. जर तुम्हाला जाहिरात बघण्याची इच्छा नसेल तर तुम्ही स्क्रोल किंवा स्वाइप करू शकता. या व्हिडीओ जाहिराती १५ सेकंदांच्या असतील व जर कुणाला फेसबुकवर १८ ते ५४ वयोगटासाठी जाहिरात द्यायची असेल तर त्यासाठी दिवसाला २० लाख अमेरिकी डॉलर मोजावे लागतील. याचाच दुसरा अर्थ असा, की फेसबुकने आता सोशल मार्केटिंग सोडून स्टाइल अ‍ॅड म्हणजे रीतसर जाहिराती सुरू करण्याचा मार्ग पत्करला आहे असे नेट इलियट यांनी सांगितले. लवकरात लवकर जाहिरातसेवा वेगाने सुरू करण्याचा प्रयत्न आहे असेही ते म्हणाले. कंपनीने अजून जाहिरातींचे नवे आकृतिबंध चाचपण्याचा मार्ग अवलंबलेला नाही, परंतु वापरकर्त्यांचा अनुभव व व्हिडीओ जाहिरातींचा परिणाम या मुद्दय़ांचा विचार करावा लागणार आहे. फेसबुकला इतर मोफत संकेतस्थळांप्रमाणे जाहिरातीतून मोठे उत्पन्न मिळत आहे. त्यांनी ऑक्टोबरमध्ये जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार तिसऱ्या तिमाहीतील महसूल ६६ टक्के वाढला. गेल्या वर्षी तो १.८ अब्ज डॉलर होता.