सरकार जर एखाद्या फेसबुक वापरकर्त्यांच्या खात्यावर पाळत ठेवत असेल, तर त्या वापरकर्त्यांला तशी माहिती देण्याचा निर्णय फेसबुकने घेतला आहे. काही देशांतील सरकारे समाजमाध्यमांवर पाळत ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे व्यक्तिगत स्वातंत्र्याचाही संकोच होऊ शकत असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे.

फेसबुकचे माध्यम सुरक्षा अधिकारी अ‍ॅलेक्स स्टॅमॉस यांनी ही माहिती १७ ऑक्टोबरला लिहिलेल्या ब्लॉगमध्ये दिली आहे. तुमच्या फेसबुक
खात्यावर हॅकर्सनी हल्ला केला आहे, की सरकारचेच ते कृत्य आहे, यात फरक कसा करणार, याचे उत्तर मात्र स्टॅमॉस यांनी गुलदस्त्यात ठेवले आहे. चीनमध्ये फेसबुकला अद्याप शिरकावच करता आलेला नाही चीन सरकारची स्वतंत्र समाजमाध्यमे आहेत व त्यावर सरकारचे नियंत्रण आहे.

चीनने १.८० कोटी सरकारी कर्मचाऱ्यांची व्यक्तिगत माहिती चोरली होती व त्यासाठी पद्धतशीर हॅकिंग केले होते, असा आरोप अमेरिकेतील काही माध्यमांनी केला होता. चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी अलिकडेच इतर देशांच्या कंपन्यांशी करार केला असून खासगी कंपन्यांची माहिती सरकार हॅक करणार नाही, असे आश्वासन दिले आहे.

सरकारकडूनच हॅकिंग!

सरकारी पाळतीच्या घटना फेसबुकने याआधी कधीच सांगितलेल्या नाहीत, हे खरे असले तरी सिरिया इलेक्ट्रॉनिक आर्मी, टय़ुनिशियन सरकार व चीन सरकार यांनी फेसबुकची माहिती हॅक करण्याचे प्रयत्न अनेकदा केले आहेत. अमेरिकी सरकारने २१७३१ खात्यांची माहिती २०१४ मध्ये फेसबुककडे मागितली होती व कुठल्याही देशाच्या सरकारने फेसबुककडे मागितलेल्या माहितीपेक्षा हे प्रमाण अधिक आहे.