मागच्या महिन्याभरापासून पूर्व लडाखमध्ये नियंत्रण रेषेजवळ मोठा तणाव आहे. हा तणाव कमी करण्याची प्रक्रिया सुरु असताना सोमवारी रात्री अचानक गलवाण खोऱ्यात भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये अभूतपूर्व संघर्ष उदभवला. यामध्ये भारताचे २० जवान शहीद झाले तर चीनचे ४३ सैनिक ठार झाल्याचे वृत्त आहे.

मागच्या ४५ वर्षात पहिल्यांदाच चीनला लागून असलेल्या सीमेवर झालेल्या संघर्षात जवान शहीद झाले आहेत. यापूर्वी १९७५ साली अरुणाचल प्रदेशमध्ये चिनी सैनिकांनी घात लावून केलेल्या हल्ल्यात भारताचे जवान शहीद झाले होते.

आणखी वाचा- भारतीय सैन्यांकडूनही चोख उत्तर, चीनचे ४३ जवान ठार आणि गंभीर जखमी

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री नियंत्रण रेषा तसेच गलवाण आणि श्योक नदीच्या जंक्शनच्या भागात हा संघर्ष झाला. गलवान खोऱ्यातून चिनी सैन्याने माघार घ्यावी, यासाठी पेट्रोलिंग पॉईँट १४ वर दोन्ही बाजूच्या सैन्य अधिकाऱ्यांमध्ये चर्चा सुरु होती. हा भाग नियंत्रण रेषेजवळ आहे. इंडियन एक्सप्रेसने हे वृत्त दिले आहे.

आणखी वाचा- भारत आणि चीन दोघांसाठी गलवाण खोरं इतकं महत्वाचं का आहे?

तणाव कमी करण्यासाठी दोन्ही बाजूच्या सैन्य अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या चर्चेत बफर झोन निर्माण करण्याचं ठरलं होतं. म्हणजे नियंत्रण रेषा तसेच गलवाण आणि श्योक नदीच्या जंक्शनचा भाग पूर्णपणे निर्मनुष्य करण्याचा निर्णय़ झाला होता. समोरासमोरचा संघर्ष टाळण्यासाठी भारतीय सैनिक नदीच्या पश्चिमेला तर चिनी सैनिक पूर्वेला नियंत्रण रेषेजवळ जाणार होते.

आणखी वाचा- चीनकडून करण्यात आला LAC बदलण्याचा प्रयत्न, परराष्ट्र मंत्रालयाने सांगितला घटनाक्रम

बफर झोनमध्येच गलवाण नदीच्या दक्षिण किनाऱ्यावर चिनी सैनिकांनी जेव्हा, नवीन चौकी उभारण्याचं काम सुरु केलं. त्यावरुन नव्या वादाला सुरुवात झाली असे अधिकाऱ्याने सांगितले. १६ बिहार रेजिमेंटचे कमांडिंग अधिकारी आणि त्यांच्या तुकडीने ही चौकी हटवण्यासाठी चीनच्या सैन्य अधिकाऱ्यांकडे आग्रह धरताच लगेच तणाव वाढला आणि संघर्षाची स्थिती उदभवली.

आणखी वाचा- भारत-चीनमधील संघर्षानं १९६७ मधील ‘त्या’ घटनेची आठवण : माजी लष्करप्रमुख

दोन्ही बाजूच्या सैनिकांमध्ये हाणामारी सुरु झाली. चीनच्या सैनिकांनी लाठया, बांबू, बॅट आणि खिळयांनी हल्ला केला. भारतीय जवानांनी सुद्धा त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले. या संघर्षामध्ये काही सैनिक नदीमध्ये पडले किंवा त्यांना ढकलण्यात आले. काही मृतदेह नदीमधून बाहेर काढण्यात आले आहेत. हायपोथरमिया म्हणजे शरीराचे तापमान कमी झाल्यामुळे काही सैनिकांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे चीनला लागून असणाऱ्या सर्व सीमांवर मोठया प्रमाणात तणाव वाढला आहे. दोन्ही देशांनी आपआपले सैनिक नियंत्रण रेषेजवळ आणून ठेवले आहेत.