भारत-चीन यांच्यादरम्यान पूर्व लडाखमधील सीमेवर संघर्ष अजून मिटला नसताना थंडीच्या दिवसात भारतीय लष्कराच्या जवानांना अतिथंड अशा प्रतिकूल हवामानाचा सामना करावा लागत आहे, परंतु  आता तेथे  सैनिकांसाठी सर्व सोयींनी युक्त अशी निवारा व्यवस्था उभारण्यात आली आहे.

अतिउंचीवरील प्रदेशास अनुकूल असा हा आधुनिक अधिवास (निवारा) आहे. थंडीच्या काळात चीनने कदाचित पुन्हा आगळिक केलीच तर या आधुनिक निवाऱ्यांचा सैनिकांना मोठा फायदा होणार आहे.

सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या लडाख भागात थंडीच्या दिवसात नोव्हेंबरनंतर हिमकणांचा थर हा ४० फुटांचा असतो तापमान उणे ४० अंश सेल्सियस असते. त्यातही आपले सैनिक प्राणपणाने देशाचे रक्षण करीत असतात. आता या सैनिकांच्या सोयीसाठी खास निवारे तयार करण्यात आले असून त्यामुळे या जवानांची कार्यक्षमता वाढणार आहे. लष्कराने हे निवारे बसवण्याचे काम पूर्ण केले आहे. भारतीय लष्कराचे किमान पन्नास हजार जवान अति उंचीवरील या प्रदेशात हाडे गोठवणाऱ्या थंडीत देशाचे रक्षण करीत असतात. पूर्व लडाखमध्ये तापमान शून्याखाली जात असते.

चीननेही तेवढेच सैनिक सीमेवर तैनात केले आहेत. मे महिन्यापासून चीन व भारत यांच्यात सीमेवर सुरू असलेला संघर्ष मिटण्याची चिन्हे नसताना प्रतिस्पर्धी देशाच्या कुठल्याही कारस्थानांना सडेतोड उत्तर देण्यास भारतीय सैनिक आता अधिक सक्षम आहेत. लडाख सीमेवर बसवण्यात आलेले हे निवारे अत्याधुनिक असून त्यात वीज, पाणी, शेगडय़ा या सुविधा आहेत शिवाय जवानांच्या आरोग्याचीही काळजी घेण्यात आली आहे. अगदी सीमेजवळील  छावण्यात काम करणाऱ्या सैनिकांच्या तंबूंमध्ये थंडीतही उबदारपणा रहावा यासाठी व्यवस्था केली आहे. ६ नोव्हेंबर रोजी भारत व चीन यांच्यात लष्करी पातळीवर चर्चेची शेवटची फेरी झाली होती त्यात काही मार्ग निघू शकला नव्हता.