भाजपाच्या भोपाळच्या खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी त्यांना जडलेल्या शारीरिक व्याधींसाठी काँग्रेसला जबाबदार धरलं आहे. “काँग्रेस सरकारच्या काळात तुरूंगात असताना छळ करण्यात आला. त्यामुळे अनेक आजार जडले असून, नजर कमी झाली आहे. त्याचबरोबर मेंदूवरही सूज आली आहे,” असा आरोप प्रज्ञा ठाकूर यांनी केला.

खासदार प्रज्ञासिंह ठाकूर आतंरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भोपाळमधील भाजपा कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला उपस्थित होत्या. यावेळी त्यांनी त्यांना जडलेल्या शारीरिक व्याधींसाठी काँग्रेस जबाबदार असल्याचा आरोप केला. “काँग्रेसचं सरकार असताना नऊ वर्षे तुरूंगात होते. या काळात तुरूंगात छळ करण्यात आला. त्यामुळे मला अनेक गंभीर दुखापती झाल्या, ज्या अजूनही कायम आहेत. अनेक जुन्या व्याधीही आता बळावल्या आहेत. या सगळ्या छळामुळे माझ्या डोळ्यांत रेटिना झाला आहे. त्यामुळे माझी नजर कमी झाली असून मेंदू व डोळ्यात सूज व पू झाला आहे. उजव्या डोळ्याची नजर कमी झाली असून, डाव्या डोळ्यानं बघू शकत नाही,” असं प्रज्ञासिंह ठाकूर म्हणाल्या.

करोनानंतर लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनच्या काळात प्रज्ञासिंह ठाकूर यांची बेपत्ता असल्याची पत्रक त्यांच्या मतदारसंघात लावण्यात आली होती. यावरही प्रज्ञासिंह ठाकूर यांनी भूमिका स्पष्ट केली. लॉकडाउनमुळे प्रवासावर बंधने घालण्यात आली होती. त्यामुळे दिल्लीहून भोपाळला येऊ शकले नाही. माझ्यासह सोबतचे कर्मचारी व सुरक्षा रक्षकांना प्रवासावरील निर्बंधनांमुळे तिकीट मिळाले नाही,” असं त्यांनी सांगितलं.

दरम्यान, खासदार प्रज्ञासिंह ठाकूर यांनी केलेले आरोप काँग्रेसचे आमदार पी.सी. शर्मा यांनी फेटाळून लावले आहेत. “आम्ही महिलांचा आदर करतो. मध्य प्रदेशात १५ वर्ष व केंद्रामध्ये ६ वर्ष भाजपाचं सरकार असताना काँग्रेसनं त्यांचा छळ कसा केला? गोंधळ तयार करण्याच्या हेतूनं हे आरोप करण्यात आले आहेत,” असं शर्मा म्हणाले.