करोनामुळे मरण पावलेल्या रूग्णांचे मृतदेह पाटणा येथे गंगा नदीत टाकण्यात येत आहेत. नदीत मृतदेह टाकण्यात आल्याने करोना मृत्यूचे प्रमाण कमी आहे. बिहारमध्ये दोन इंजिनवर चालणाऱ्या जेडीयू आणि भाजपा सरकारमध्ये यावार प्राइम टाइम चर्चा होत नाहीत अशा कॅप्शनसहीत हे फोटो व्हायरल करण्यात येत होते.

बिहार काँग्रेसचे अध्यक्ष मदन मोहन झा यांनीही हे फोटो शेअर केले होते. सोशल मीडियावर हे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याने लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात भीती पसरली होती.

इंडिया टुडेच्या अँटी फेक न्यूज वॉर रूमनेयासंदर्भात सत्यता तपासली असता ही माहिती अर्धवट असल्याचं समोर आलं आहे. व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये मृतदेह गंगेमध्ये टाकण्यात आला आहे मात्र ती व्यक्ती करोना रुग्ण आहे की नाही हे कळू शकलेलं नाही.

८ जुलै रोजी प्रकाशित झालेल्या “हिंदुस्तान टाईम्स” च्या पाटणा आवृत्तीत हा फोटो छापण्यात आला होता. “पाटणा मेडिकल कॉलेज हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांनी मंगळवारी काली घाटाजवळील गंगा येथे बेवारस मृतदेहाची विल्हेवाट लावली.” असे त्या फोटोखाली पेपरमध्ये लिहिण्यात आलं होतं.

हा फोटो काढलेले एचटीचे फोटो जर्नलिस्ट परवाज खान यांनी याबाबत खुलासा केला आहे. पीएमसीएचमध्ये अज्ञात मृतदेहांची गंगेमध्ये अशा प्रकारे विल्हेवाट लावण्याची सामान्य पद्धत आहे असे ते म्हणाले. उलट सुलट होणाऱ्या दाव्यांवर त्यांनी, त्या बोटीत एकच मृतदेह असल्याचे सांगितले, तसेच पीएमसीएचने कोणतेही कोव्हिड रुग्णालय सुरु केले नसल्याचे त्यांनी सांगितले.

म्हणून, कोविड -१९ मृत्यूची संख्या कमी करण्यासाठी पाटण्यातील गंगेमध्ये मृतदेह टाकण्यात आल्याचा दावा पूर्णपणे सत्य नाही. फोटोत नदीत टाकण्यात आलेला मृतदेहाचा आणि करोना संसर्गाचा कोणताही संबध नसल्याचे समोर आले आहे.