जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम असे अशी ओळख असलेल्या गुजरातच्या मोटेरा येथील स्टेडियमचं नामकरण करण्यात आलं आहे. या स्टेडियमला आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नावं देण्यात आलं आहे. पुनर्विकसित करण्यात आलेल्या या मैदानावर आजपासून भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना सुरु झाला आहे. मात्र सामना सुरु होण्याआधीच या स्टेडियमचे नाव पंतप्रधानांच्या नावावरुन ठेवण्यात आल्याची बातमी समोर आल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. ट्विटरवरही या स्टेडियमची चर्चा आहे. #नरेंद्र_मोदी_स्टेडियम, #नरेन्द्र_मोदी_स्टेडियम_मोटेरा असे हॅशटॅग ट्विटरवर चर्चेत आहेत. मात्र त्याचवेळी #सरदार_पटेल_का_अपमान हा हॅशटॅगही चर्चेत असून नवीन स्टेडियमचे नाव बदलण्यात आल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे एकीकडून यासंदर्भात नाराजी व्यक्त केली जात असतानाच दुसरीकडे भाजपा समर्थकांनी पुन्हा एक जुना मुद्दा चर्चेत आणला आहे. तो म्हणजे भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु तसेच त्यांची मुलगी इंदिरा गांधी यांनी स्वत:लाच भारतरत्न दिल्याचा.

अनेक भाजपा समर्थकांकडून मोदींचं नाव स्टेडियमला दिलं तर काय झालं नेहरु आणि इंदिरा यांनी तर स्वत:ला भारतरत्न दिला होता असा युक्तीवाद केला जातोय.

१)

२)

३)

अशापद्धतीने अनेक ट्विट केले जात आहेत. मात्र या ट्विटमुळे पुन्हा एकदा खरोखरच पंतप्रधान जवाहरलाल नेहरुंनी स्वत:लाच भारतरत्न दिला होता का हा विषय चर्चेत आला आहे. याचसंदर्भात आपण या लेखामधून जाणून घेणार आहोत.

तर पंतप्रधान नेहरुंनी स्वत:लाच भारतरत्न दिल्याचा जो दावा सोशल मीडियावर केला जातो तो चुकीचा आहे असं सांगणारे पुरावे त्या वेळेच्या वर्तमानपत्रांमध्ये आढळतात, असं द वायरने २०१८ साली २४ जून रोजी पहिल्यांदा प्रकाशित केलेल्या लेखामध्ये केला होता. मुळात नेहरुंनी स्वत:ला भारतरत्न पुरस्कार दिला की नाही यासंदर्भातील वादाचा मूळ मुद्दा आहे या पुरस्कारासाठी देण्यात येणार नामांकन आणि पुरस्कार देण्यास सुरुवात झाली तेव्हाची पद्धत. ज्यावेळी भारतरत्न पुरस्कार देण्यास सुरुवात झाली तेव्हा पंतप्रधान त्यांच्याकडून ज्या व्यक्तींना हा पुरस्कार द्यायचा आहे त्यांची नाव राष्ट्रपतींना कळवायचे आणि त्यानुसार हा पुरस्कार दिला जायचा. मात्र यासंदर्भातील कोणताही उल्लेख २ जानेवारी १९५४ च्या गॅझेटीयरमध्ये सापडत नाही. याच गॅझेटीयरमध्ये भारतरत्नसंदर्भातील माहिती देण्यात आली आहे. तसेच त्यानंतर १५ जानेवारी १९५५ रोजी काढण्यात आलेल्या नवीन सुचनेमध्ये मरणोत्तर भारतरत्न देण्याचा उल्लेख करण्यात आला आहे मात्र तो कसा देण्यात यावा यासंदर्भातील उल्लेख त्यामध्ये नाही. त्यामुळे पंतप्रधान आणि मंत्रीमंडळाने सुचवलेल्या व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार दिला जायचा.

१९५५ साली नेहरुंना भारतरत्न पुरस्कार देण्याआधी हा पुरस्कार केवळ दोनवेळा प्रदान करण्यात आला होता. १९५४ च्या स्वातंत्र्यदिनी भारताचे शेवटचे गव्हर्नर-जनरल सी राजगोपालचारी, फिलॉसॉफिमधील मोठं नाव म्हणून ओळखले जाणारे आणि नंतर भारताचे दुसरे राष्ट्रपती ठरलेले एस. राधाकृष्णन् आणि भौतिकशास्त्रामध्ये नाव कमावणारे सी.व्ही. रमण यांना हा पुरस्कार देण्यात आला. त्यानंतर १९५५ साली प्रजासत्ताकदिनी हिंदू बनारस विद्यापिठाची स्थापना करणारे स्वांतत्र्यसेनानी भगवान दास आणि भारतीय अभियांत्रिक क्षेत्रातील आघाडीचं नाव असणारे एम. विश्वेश्वरय्या यांना हा पुरस्कार देण्यात आला.

१३ जुलै १९५५ रोजी नेहरु युरोपीयन देशांच्या दौऱ्यानंतर सोव्हिएत युनियनचा दौराकरुन भारतामध्ये परतले. शीतयुद्धाच्या कळामध्ये भारताने घेतलेली जागतिक शांततेची भूमिका पटवून देण्यासाठी नेहरुंचा हा दौरा फार महत्वाचा ठरला. जगभरातील देश दोन गटांमध्ये विभागले गेले असतानाच नेहरुच्या पुढाकाराने भारताने शांततेला प्राधान्य देण्याचा जो मुद्दा जागतिक पातळीवर मांडला त्याला इतर देशांकडूनही समर्थन मिळालं. ज्यावेळी नेहरु दिल्लीत परतले तेव्हा तत्कालीन राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद हे स्वत: राजशिष्टाचाराचे नियम बाजूला ठेव नेहरुंच्या स्वागतासाठी विमानतळावर गेले होते. नेहरुंचे त्यावेळी मोठा जल्लोषामध्ये स्वागत झालं. त्यावेळी नेहरुंनी विमानतळावरच समर्थकांसमोर एक छोटं भाषणही केलं.

त्यानंतर दोनच दिवसांनी राष्ट्रपतींनी एका विशेष मेजवानीच्या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रपती भवनामध्ये केलं होतं. याच कार्यक्रमामध्ये राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी जवाहरलाल नेहरु यांना भारतरत्न देण्याचा निर्णय जाहीर केला. राष्ट्रपतींनी सु मोटू म्हणजेच स्वत:च्या इच्छेने हा पुरस्कार देण्याचा निर्णय घेतल्याचे गुपित बराच काळ लपवून ठेवण्यात आलं होतं, असं टाइम्स ऑफ इंडियाने १६ जुलै १९५५ रोजी दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे. नेहरु हे त्या काळातील शांततेसाठी प्रयत्न करणारे आघाडीचे नेते होते अशा शब्दांमध्ये राष्ट्रपतींनी त्यांचे कौतुक केल्याचे या वृत्तामध्ये आहे.

(टाइम्स ऑफ इंडियावरुन साभार)

इंदिरा गांधी यांनाही १९७१ साली भारतरत्न पुरस्कार देण्यात आला. यावेळी इंदिरा गांधीही पंतप्रधान होत्या. भारताने पाकिस्तान आणि पूर्व पाकिस्तानमध्ये (बांगलादेश) झालेल्या युद्धामध्ये १४ दिवसांमध्ये ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर इंदिरा यांना हा पुरस्कार देण्यात आला. याचसंदर्भात ज्येष्ठ लेखक रशिद कडवाई यांनी एबीपी न्यूजसाठी लिहिलेल्या एका ब्लॉगमध्ये माहिती अधिकार अर्जांचा हवाला देत तत्कालीन राष्ट्रपती व्ही. व्ही. गिरी यांनी “इंदिरा यांना या सन्मान देण्याची पूर्ण जबाबदारी घेतोय,” असं म्हटलं होतं.