पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी सकाळी लेह, लडाखमध्ये जाऊन तिथल्या सैनिकांचं मनोधैर्य वाढवलं. तुमच्या शौर्याची जाण संपूर्ण देशाला आहे हा विश्वासही त्यांना आपल्या शब्दांमधून दिला. इतकंच नाही तर गलवान खोऱ्यात जे सैनिक जखमी झाले त्यांचीही त्यांनी भेट घेऊन विचारपूस केली. मात्र सोशल मीडियावर या भेटीवरुनच पंतप्रधान नरेंद्र मोदींना आणि भाजपाला ट्रोल केलं जाऊ लागलं. एवढंच नाही तर #MunnaBhaiMBBS हा ट्रेंडही आला. यानंतर आता खुद्द लष्कराने पत्रक काढून यावर खुलासा केला आहे.

काय म्हटलंय लष्कराने?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गलवान खोऱ्यात जखमी झालेल्या जवानांची रुग्णालयात भेट घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लडाख येथील रुग्णालयात ३ जुलै रोजी आले होते. मात्र सोशल मीडियावर यावरुन काही टीका होताना दिसते आहे. ही बाब अत्यंत दु्र्दैवी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जे काही आरोप करण्यात येत आहेत ते दु्र्दैवी आहेत असंही लष्कराने म्हटलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सैनिकांचं मनोधैर्य उंचावण्यासाठी या लेहच्या रुग्णालयात गेले होते. जसं त्यांनी लेह, लडाख येथे जाऊन सैनिकांचं मनोधैर्य उंचावलं अगदी तसंच त्यांनी गलवान खोऱ्यात जखमी झालेल्या सैनिकांचंही मनोधैर्य उंचावलं. मात्र त्यांच्या या कृतीवरही काही आरोप झाले. हे सगळे आरोप बिनबुडाचे आहेत. आपल्या देशातले शूर सैनिक जेव्हा जखमी होतात तेव्हा त्यांच्यावर कशाप्रकारे उपाय केले जातात यावरही टीका झाली ही बाबही दुर्दैवी आहे.

सध्या करोनाचं संकट देशावर आहे. त्यानुसारच लेह येथील सामान्य रुग्णालयात काही बदल करण्यात आले आहेत. एका प्रशिक्षण हॉलचं रुपांतर रुग्णालय विभागात करण्यात आलं आहे. त्यावरुनही जे काही बोललं गेलं त्यापेक्षा मोठी दुर्भाग्याची गोष्ट काय? असंही लष्कराने म्हटलं आहे.

गलवान खोऱ्यात जे सैनिक जखमी झाले त्यांना करोनाची बाधा होऊ नये म्हणून या ठिकाणी वेगळ्या कक्षात ठेवण्यात आलं आहे. त्यासाठी नेहमी व्हिडीओ ऑडिओ प्रशिक्षण दिल्या जाणाऱ्या हॉलचं वेगळ्या रुग्ण कक्षेत रुपांतर करण्यात आलं आहे असंही लष्कराने त्यांच्या पत्रकात म्हटलं आहे.

पंतप्रधान मोदींवर काय झाली टीका?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल अचानक लेह आणि लडाखमध्ये जाऊन सैनिकांचं मनोधैर्य उंचावलं. त्यानंतर त्यांनी लेह येथील जखमी जवानांचीही भेट घेतली. या भेटीत त्यांनी तुमचा देशाला अभिमान आहे असंही म्हटलं होतं. दरम्यान या भेटीवरुन त्यांना सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं. मुन्नाभाई एमबीबीएस या सिनेमात ज्याप्रमाणे मुन्नाभाई आपण डॉक्टर असल्याचं त्याच्या वडिलांना भासवतो तशाच प्रकारे ही भेट होती असंही म्हटलं गेलं. मुन्नाभाई एमबीबीएस या सिनेमातले काही सीनही ट्विट करुन या घटनेशी जोडले गेले. हा सगळा प्रकार जेव्हा भारतीय लष्कराला समजला तेव्हा त्यांनी पत्रक काढून या सगळ्यावर स्पष्टीकरण दिलं आहे. तसंच नरेंद्र मोदी यांनी लष्करी जवानांचं मनोधैर्य उंचावण्यासाठी जी भेट दिली त्यावर होणारी टीका अत्यंत दुर्दैवी आहे असंही म्हटलं आहे.