भारताच्या हवाई दलाने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून केलेल्या ‘सर्जिकल स्ट्राइक २’ची माहिती राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिली आहे. सर्जिकल स्ट्राइकनंतर दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षा समितीची बैठक सुरु आहे. या बैठकीला मोदींसह अरुण जेटली, परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज, संरक्षण मंत्री निर्मला सीतारमन आणि सुरक्षा दलांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीपूर्वी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना कारवाईबाबतची माहिती दिल्याचे समजते. यानंतर बैठकीला सुरुवात झाली. उरी येथे सर्जिकल स्ट्राइकनंतर आज भारताने केलेल्या हवाई हल्ल्याच्या नियोजनातही डोवल यांचा सहभाग असल्याची चर्चा आहे. जाणून घेऊयात कोण आहेत डोवाल…
अजित डोवाल हे १९६८ च्या आयपीएस केडरचे अधिकारी आहेत. सैन्याकडून देण्यात येणार्या किर्ती चक्राने सन्मानित करण्यात आलेले ते पहिले पोलिस अधिकारी आहेत. २००५ साली इंटेलिजेंस ब्युरोच्या प्रमुख पदावरून निवृत्त झाले होते.
२०१४ सालच्या निवडणुकांदरम्यान त्यांची भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पदी नेमणूक करण्यात आली होती.
१९९९ साली कंधारमध्ये इंडियन एअरलाइनचे आयसी ८१४ विमान अपहरणकर्त्यांकडून अपहरण करण्यात आले होते. त्यावेळी अपहरणकर्त्यांबरोबर वाटाघाटी करण्यात त्यांचा महत्वाचा वाटा होता.
१९८४ मध्ये खलिस्तानी आतंकवादीविरोधात चालवण्यात आलेल्या ऑपरेशन ब्ल्यु स्टारमध्ये देखील त्यांनी महत्वाची भूमिका निभावली, यात ते सीक्रेट एजेंट बनून रिक्षावाल्याच्या पेहराव करून सुवर्ण मंदिरात गेले होते.
उरी हल्ल्यानंतर सर्जिकल स्ट्राईकचे नियोजन आणि धोरण ठरवण्यात त्यांचा महत्वाचा वाटा होता.
इंटेलिजन्स ब्युरोमध्ये तब्बल ३३ वर्ष अधिकारी पदावर जम्मू कश्मीर, पंजाब येथे काम केले आहे.
२०१४ पासून ते प्रमुख राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून काम पाहत आहेत
दरम्यान १४ फेब्रुवारी रोजी झालेल्या पुलवा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अखेर मंगळवारी पहाटे साडे तीनच्या सुमारास भारताच्या हवाई दलाने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून एअर स्ट्राइक केले. पाकमधील बालाकोट येथील दहशतवादी संघटनांच्या तळांना हवाई दलाच्या विमानांनी लक्ष्य केले असून या तळांवर सुमारे २१ मिनिटे बॉम्बचा वर्षाव सुरु होता, असे समजते. या कारवाईनंतर दिल्लीत केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षा समितीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 26, 2019 12:13 pm