अपयशी ठरलेल्या नेत्यांचे देशात कोणीही ऐकत नाहीत. त्यामुळेच अपयशी नेते अमेरिकेत जाऊन भाषणे देतात, अशा शब्दांमध्ये भाजपचे अध्यक्ष अमित शहांनी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींना टोला लगावला. ‘अयशस्वी नेते भाषणे देण्यासाठी अमेरिकेला पळतात. कारण मायदेशात त्यांचे कोणीही ऐकून घेत नाही,’ असे म्हणत शहांनी नाव न घेता राहुल यांच्यावर निशाणा साधला. कोलकात्याच्या दौऱ्यावर असलेल्या शहांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना राहुल गांधींच्या अमेरिकेतील भाषणावर प्रतिक्रिया दिली.

राहुल गांधींनी काल (मंगळवारी) अमेरिकेती बर्कले विद्यापीठात भाषण केले. या भाषणात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली. केंद्र सरकारच्या निर्णयांवरुन राहुल गांधींनी मोदींना लक्ष्य केले. ‘मोदींच्या राजवटीत हिंसा, द्वेष आणि ध्रुवीकरणाच्या राजकारणाने डोके वर काढले आहे. हे मुद्दे देशासाठी नवे असून, हाच ‘न्यू इंडिया’ आहे,’ अशा शब्दांमध्ये राहुल गांधींनी मोदींवर शरसंधान साधले. राहुल यांच्या या भाषणावरुन काँग्रेस आणि भाजपमध्ये जुंपली आहे.

भाजपचे अध्यक्ष अमित शहांनी राहुल गांधींचे नाव न घेता त्यांच्या टीकेचा खरपूस समाचार घेतला. ‘सध्याचे सरकार कामगिरीला महत्त्व देते. या सरकारची स्थिती काँग्रेस सरकारसारखी नाही,’ अशा शब्दांमध्ये शहांनी राहुल गांधींच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. ‘कामगिरीच्या जोरावर सरकार चालवण्याची सुरुवात भाजपने केली आहे. मात्र काही नेते अमेरिकेत जाऊन भाषणे देतात. कारण त्यांना देशात कोणीही ऐकत नाही,’ असे म्हणत त्यांनी राहुल गांधींना टोला लगावला.

राजकारणातील घराणेशाही बाजूला सारण्यात भाजपचा मोठा वाटा असल्याचेही शहांनी म्हटले. राहुल गांधींच्या अमेरिकेतील भाषणात घराणेशाहीचा उल्लेख होता. ‘संपूर्ण देशात घराणेशाही आहे. अखिलेश यादव यांच्यापासून अभिषेक बच्चन यांच्यापर्यंत सगळीकडेच घराणेशाही पाहायला मिळते,’ असे राहुल गांधींनी म्हटले. त्यांच्या या विधानालाही अमित शहांनी नाव न घेता प्रत्युत्तर दिले. राजकारणातील घराणेशाही दूर करण्यात भाजपने महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्याचे शहा म्हणाले.