सोनिया गांधी यांचा आरोप

देशातील करोना स्थिती हाताळण्यात केंद्र सरकारला अपयश आले असून राज्यांना लशींचा अपुरा पुरवठा करण्यात आला, अशी टीका काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केली. काँग्रेस शासित राज्यातील कोविड स्थितीचा आढावा काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी एका बैठकीत घेतला त्यात त्यांनी ही टीका केली.

कोविड १९ विषाणूची दुसरी लाट आल्यानंतर देशभरातील काही राज्यात संसर्गाचे प्रमाण वाढले आहे. काँग्रेस शासित मुख्यमंत्र्यांच्या आभासी बैठकीत त्यांनी मुख्यमंत्री व मंत्र्यांना चाचण्या, संपर्क शोध व लसीकरण या तीन मुद्दय़ांवर भर देण्यास सांगितले. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी , राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल या वेळी उपस्थित होते.

काँग्रेस प्रमुख सोनिया गांधी यांनी लस पुरवठा, औषध पुरवठा, औषधांची उपलब्धता , व्हेंटिलेटरची उपलब्धता यावर माहिती घेतली, असे पक्षाचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी म्हटले आहे.

नरेंद्र मोदी सरकारने कोविड स्थिती चुकीच्या पद्धतीने हाताळली असून देशात लशीची टंचाई निर्माण करून लस निर्यातीला प्राधान्य दिल्याचा आरोप सोनिया गांधी यांनी केला. त्या म्हणाल्या,की सार्वजनिक सभा,प्रचार सभा कोविड १९ रुग्ण संख्या वाढल्याने रद्द करायला हव्या होत्या. केंद्र सरकारने ज्या आर्थिक योजना जाहीर केल्या त्याचा राज्यात अपेक्षित परिणाम झाला की नाही याची विचारणा सोनिया गांधी यांनी केली. निवडणूक प्रचारासाठी लोक मोठय़ा प्रमाणात जमत असून धार्मिक कार्यक्रमातही लोकांची गर्दी होत आहे, त्यामुळे रुग्ण संख्या वाढत असल्याचे त्या म्हणाल्या.

सोनिया गांधी यांनी सुरुवातीच्या निवेदनात करोना रुग्णांची संख्या वाढत असल्याचे सांगून प्रमुख विरोध पक्ष या नात्याने काँग्रेसने जबाबदारी पार पाडावी असे सांगितले. हे प्रश्न काँग्रेसने उपस्थित केले पाहिजेत, केवळ प्रचारकी थाटाची माहिती न देता लोकांच्या हितासाठी काम केले पाहिजे. सरकारच्या कामात पारदर्शकता असली पाहिजे, रुग्णांची संख्या, मृतांचे आकडे हे काँग्रेस शासित किंवा कुठल्याही राज्यांनी आहे तेच सांगितले पाहिजेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

गेहलोत यांनी लशींचा अपुरा पुरवठा होत असल्याचे म्हटले असून काँग्रेस शासित राज्यांना शत्रू न मानता केंद्राने विश्वासात घेण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

पंजाबमध्ये पाच दिवसांपुरताच लससाठा 

चंडीगड : पंजाबमध्ये करोना लशीचा आणखी पाच दिवस पुरेल एवढाच साठा असल्याचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी शनिवारी सांगितले.  केंद्राने लशीचा आणखी पुरवठा करावा, अशी मागणी त्यांनी केली असून राज्यात दैनंदिन ८५-९० हजार व्यक्तींचे लसीकरण होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पंजाबमध्ये सध्या ५.७ लाख इतका लशीचा साठा असून लसीकरणाचा वेग बघता ही लस पाच दिवसांत संपणार आहे. केंद्राकडून आणखी लस मिळण्याची अपेक्षा व्यक्त करून सिंग यांनी सांगितले, की दिवसाला दोन लाख मात्रा देण्याचे उद्दिष्ट साध्य करण्याची पंजाबची तयारी आहे. त्या वेगाने आताचा लसपुरवठा केवळ तीन दिवसच पुरणार आहे. अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, अमरिंदर सिंग यांनी पंतप्रधान मोदी व आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांना पत्र पाठवून लशीचा आणखी पुरवठा करण्याची मागणी केली आहे.

देशात लशीची टंचाई निर्माण करून लस निर्यातीला प्राधान्य देण्यात आले.  सार्वजनिक सभा, प्रचार सभा करोनारुग्ण संख्या वाढल्याने रद्द करायला पाहिजे होत्या.  निवडणूक प्रचारासाठी लोक मोठय़ा प्रमाणात जमत असून धार्मिक कार्यक्रमातही  गर्दी होते. -सोनिया गांधी