मागील १८ वर्षांपासून आपल्या पक्षकारांसाठी न्यायालयात वाद घालणाऱ्या एका वकिलाकडे एलएलबीची पदवीच नसल्याचे समोर आले आहे. सहकारी वकिलांच्या मदतीने पोलिसांनी सोमवारी त्याला बेंगळुरूच्या मायो हॉल न्यायालयातून अटक केली. सुर्यप्रकाश (वय ५१) असे बोगस वकिलाचे नाव आहे.

हे प्रकरण बेंगळुरू येथील आहे. न्यायालयात एका खटल्यात सुनावणी सुरू असतानाच सुर्यप्रकाशला अटक करण्यात आली. सुर्यप्रकाश आपल्या पक्षकाराची बाजू मांडत होता. त्याचवेळी सहकारी वकिलांना संशय आला. त्यांनी न्यायाधीशांना सुर्यप्रकाश यांच्या पदवीच्या प्रमाणपत्राची मागणी केली. त्यावेळी सुर्यप्रकाश गडबडला आणि त्याने इतर वकिलांविरोधात आवाज उठवत धमकी दिली. जर तुम्ही माझी तक्रार केली तर मी तुम्हा सर्वांना तुरूंगात पाठवेन असा दमच त्याने दिला. ‘विजय कर्नाटका’ने यासंबंधीचे वृत्त दिले आहे.

त्यानंतर सर्व वकिलांनी त्याला वकील संघटनेच्या कार्यालयात नेले आणि त्याच्या कागदपत्रांची तपासणी केली. त्यानंतर तो बोगस वकील असल्याचे समोर आले. सर्व वकिलांनी सुर्यप्रकाशला घेऊन पोलीस ठाण्यात गेले. सुरूवातीला सुर्यप्रकाशने आरोप फेटाळला पण नंतर त्याने कायद्याची पदवी नसल्याचे मान्य केले. सुर्यप्रकाशच्या कबुलीनाम्यानंतर पोलीस अधिकारीही हैराण झाले.

गत १८ वर्षांपासून सुर्यप्रकाशने उच्च न्यायालयासहित इतर न्यायालयात १०० पेक्षाही जास्त प्रकरणे पाहिली आहेत. एका वकिलाने याबाबत म्हटले की, आम्हाला वाटलं होतं की सुर्यप्रकाश हे एक ज्येष्ठ वकील आहेत. त्यामुळे आम्ही त्यांना कायम मान देत होतो. पण ते बोगस वकील असल्याचे ऐकल्यानंतर धक्काच बसला. त्यांनी यापूर्वीही पोलीस आणि न्यायालयीन कर्मचाऱ्यांना धमकावले आहे.