कर्नाटक बँकेच्या बनावट शाखेवर धाड टाकत पोलिसांनी मोठ्या गुन्ह्याचा पर्दाफाश केला आहे. बालिया जिल्ह्यातील मुलायमन नगरमध्ये ही बनावट ब्रांच सुरु करण्यात आली होती. पोलिसांनी याप्रकरणी एका व्यक्तीला अटक केली असून त्याच्याकडून १.३७ लाख रुपये जप्त केले आहेत. पोलिसांनी आरोपीकडून मोठ्या प्रमाणात बनावट ओळखपत्रं जप्त केली आहेत.

अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आफाख अहमद असून या बनावट बँकेत ब्रांच मॅनेजर असल्याचं सांगत तो लोकांची फसवणूक करत होता. त्याने आपली ओळख विनोद कुमार कांबळी असल्याची खोटी बतावणी केली होती. आपण मुंबईचे रहिवासी असल्याचीही खोटी माहिती त्याने दिली होती. अहमदकडे खोट्या नावाचं आधारकार्ड आणि ओळखपत्रंही आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या बँकेत १५ जणांनी सेव्हिंग अकाऊंट आणि फिक्स डिपॉझिट केलं होतं. आरोपी अहमदने यामधून एकूण १.३७ लाख रुपये जमवले होते. पोलिसांना कारवाईदरम्यान फॉर्म, पासबूक, तीन संगणक, लॅपटॉप, फर्निचर आणि इतर गोष्टी जप्त केल्या आहेत.