केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांच्या शैक्षणिक पात्रतेबाबत त्यांनी चुकीची माहिती दिल्याच्या प्रकरणाबाबत दाखल करण्यात आलेल्या तक्रारीची दखल घेण्याचे दिल्ली न्यायालयाने मान्य केले आहे.
महानगर दंडाधिकारी आकाश जैन यांनी या तक्रारीची दखल घेतली असून हे प्रकरण सुनावणीपूर्व पुरावे नोंदवण्यासाठी २८ ऑगस्टला पटलावर ठेवले आहे. सध्याची तक्रार वेळेच्या मर्यादेत दाखल केलेली असून त्याची दखल घेण्यात येत आहे. आता सुनावणीपूर्व पुराव्यांसाठी २८ ऑगस्ट ही तारीख देण्यात येत आहे असे त्यांनी सांगितले.
स्मृती इराणी यांच्याविरोधात मुक्त लेखक अहमेर खान यांनी तक्रार दाखल केली असून त्यात असा आरोप केला आहे, की श्रीमती इराणी यांनी निवडणूक आयोगापुढे लोकसभा व राज्यसभा निवडणुकांसाठी अर्ज भरताना वेगवेगळी तीन प्रतिज्ञापत्रे दिली आहेत व त्यात त्यांच्या शैक्षणिक पात्रतेविषयी वेगवेगळी माहिती दिली आहे.
न्यायालयाने गेल्या १ जून रोजी आदेश राखून ठेवला होता, तक्रारीची दखल घ्यायची की नाही याबाबतचा तो निर्णय होता. खान यांचे वकील के.के.मनन यांनी सांगितले, की एप्रिल २००४ च्या लोकसभा निवडणूक प्रतिज्ञापत्रात इराणी यांनी दिल्ली विद्यापीठातून दूरशिक्षणाने १९९६ मध्ये बीए पूर्ण केल्याचे म्हटले आहे तर राज्यसभेच्या निवडणकीत ११ जुलै २०११ रोजी त्यांनी प्रतिज्ञापत्रात बी.कॉमचा एक भाग दिल्ली विद्यापीठातून दूरशिक्षणाने पूर्ण केल्याचे म्हटले होते. १६ एप्रिल २०१४ रोजी लोकसभा निवडणुकीसाठी अमेठी लोकसभा मतदारसंघातून अर्ज भरताना त्यांनी बी.कॉम भाग १ दिल्ली विद्यापीठातून मुक्त शिक्षणाने पूर्ण केल्याचे म्हटले आहे. स्मृती इराणी यांनी केलेल्या तीनही प्रतिज्ञापत्रातील माहिती विसंगत आहे, स्थावर मालमत्तेच्या तपशिलातही फरक आहे. लोकप्रतिनिधी कायदा १९५१ च्या कलम १२५ ए अन्वये विसंगत किंवा चुकीची माहिती प्रतिज्ञापत्राने देणे हा शिक्षापात्र गुन्हा आहे.