बनावट पदवी प्रकरणी अटकेत असलेले दिल्लीचे माजी कायदामंत्री जितेंद्रसिंह तोमर यांनी बिहारमधील एका महाविद्यालयातून १९९८-९९ मध्ये कायद्याची पदवी घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. या पदवीसाठी प्रवेश घेण्याकरिता त्यांनी अवध विद्यापीठाची बीएस्सीची बनावट पदवी सादर केली, असा त्यांच्यावर आरोप आहे.
तोमर यांनी मिळविलेली कायद्याची पदवी तरी खरी आहे का, याची चौकशी करण्यासाठी दिल्ली पोलिसांनी त्यांना शुक्रवारी मुंगेर (बिहार) येथील विश्वनाथसिंह कायदा महाविद्यालयात नेले. प्राचार्य आर. के. मिश्रा यांच्यासमोर त्यांची तीन तास चौकशी करण्यात आली. महाविद्यालयाच्या नोंदवहीनुसार तोमर यांनी तेथे १९९४-९५ मध्ये प्रवेश घेतल्याचे, तसेच १९९८-९९ मध्ये त्यांना पदवी मिळाल्याचेही स्पष्ट झाले आहे. मात्र प्रवेश घेताना त्यांनी दिलेला स्थानिक पत्ता चुकीचा असल्याचे यावेळी उघड झाले.     दरम्यान, तोमर यांची गुरुवारीही चौकशी करण्यात आली होती. त्यांना के. एस. साकेत पदव्युत्तर महाविद्यालय आणि फैजाबादच्या आरएमएल अवध विद्यापीठ येथे नेण्यात आले होते. तेथून विज्ञानशाखेची पदवी घेतल्याचा दावा तोमर यांनी केला होता. मात्र तोमर यांना त्या महाविद्यालयातील त्यांची वर्गखोली, प्रयोगशाळा, स्वच्छतागृह कोठे आहे हेही सांगता आले नाही.
दरम्यान, तोमर यांना टिलका मांझी भागलपूर विद्यापीठात विद्यार्थ्यांच्या संतापाचा सामना करावा लागला. एआयएसए आणि एलजेपीच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्यावर अंडीफेक केली.
हकालपट्टीची शक्यता
तोमर यांनी त्यांच्यावरील बनावट पदवी आरोपासंदर्भात आपली दिशाभूल केल्याची आपच्या वरिष्ठ नेत्यांची भावना असून, या प्रकरणामुळे आपच्या प्रतिमेला जात असलेला तडा लक्षात घेऊन तोमर यांची पक्षातून हकालपट्टीची  शक्यता असल्याचे पक्षाच्या एका नेत्याने सांगितले.