इशरत जहॉं बनावट चकमक प्रकरणात राजकारण्यांचा हात होता, असा संशय सीबीआयने व्यक्त केला असून, हे हत्याकांड घडवून आणण्यासाठी राजकारण्यांकडूनच कट रचण्यात आला होता, असे सीबीआयला वाटते आहे. त्यामुळेच त्या दिशेने तपास करण्यास सीबीआयच्या अधिकाऱयांनी सुरुवात केलीये.
दोन दिवसांपूर्वीच सीबीआयने इशरत जहॉं हत्येप्रकरणी आरोपपत्र विशेष न्यायालयात दाखल केले. ही चकमक बनावट होती आणि इशरत व तिच्या मित्रांची हत्या करण्यात आली होती, असे आरोप आरोपपत्रात ठेवण्यात आलेत. आता राजकारण्यांनीच षडयंत्र रचून हे हत्याकांड घडवून आणल्याचा संशय सीबीआयमधील सूत्रांनी व्यक्त केला.
गुप्तवार्ता विभागाचे (आयबी) विशेष संचालक राजेंद्र कुमार हे त्यावेळी गुजरातमध्ये कार्यरत होते. त्यांच्यावर सीबीआयने आधीपासूनच संशय व्यक्त केलाय. इशरत जहॉं हत्येप्रकरणातील पहिले प्रतिज्ञापत्र राजेंद्र कुमार यांनीच ऑगस्ट २००९ मध्ये न्यायालयात सादर केले होते. इशरत आणि तिच्यासोबतचे तिघेजण हे लष्करे तोयबाचे हस्तक होते, असे या प्रतिज्ञापत्रामध्ये त्यावेळी म्हटले होते. सीबीआयकडून या प्रकरणाचा तपास करण्यालाही त्यांनी त्यावेळी विरोध केला होता.
त्याचवर्षी सप्टेंबर महिन्यात दुसचे प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर करण्यात आले. या प्रतिज्ञापत्रा या प्रकरणाचा सीबीआयकडून तपास करण्याला विरोध करण्यात आला नव्हता. त्याचबरोबर इशरत आणि इतर तिघांबद्दल गुप्तवार्ता विभागाकडून मिळालेले पुरावे ठोस नव्हते, असे या प्रतिज्ञापत्रात म्हटले होते. त्यामुळेच या प्रकरणात गुप्तवार्ता विभागातील अधिकाऱयांची काय भूमिका होता, याचा शोध घेत असल्याचे सीबीआयने दोन दिवसांपूर्वी सादर केलेल्या आरोपपत्रात म्हटले आहे.