News Flash

फेक एन्काऊंटर; जवानांनी अतिरेकी समजून मजुरांनाच मारलं, नंतर दाखवले दहशतवादी

कॅप्टनसह तिघांविरुद्ध आरोपपत्र दाखल

जम्मू काश्मीर पोलिसांनी शनिवार शोपियन येथील फेक एन्काऊन्टर प्रकरणी भारतीय लष्करातील एका कॅप्टनसह तिघांविरूद्ध न्यायालयाच आरोपपत्र दाखल केले. तीन मजुरांच्या बनावट चकमकीप्रकरणी शोपियनच्या मुख्य जिल्हा व सत्र न्यायालयात हे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. भारतीय सैन्याने १८ जुलै २०२० रोजी शोपियनच्या अशिमपुरा येथे झालेल्या चकमकीत तीन अज्ञात अतिरेक्यांना ठार मारण्याचा दावा केला होता. या प्रकरणानंतर चौकशीसाठी जम्मू-काश्मीर पोलिसांनी विशेष तपासणी पथकाची (एसआयटी) स्थापना केली होती. त्यानंतर या पथकाने पीडितांच्या कुटुंबाची भेट घेत चकमक झालेल्या ठिकाणीची पाहणी केली. तपासादरम्यान ४९ साक्षीदारांचा जबाब नोंदविण्यात आला होता.

शोपियन न्यायालयाने ६२ राष्ट्रीय राफयल तुकडीचे कॅप्टन भूपिंदर यांच्याविरुद्ध फौजदारी न्यायालयाच्या कायद्याआधारे खटला चालवला जावू शकतो का? अशी विचारणा लष्कराच्या अधिकाऱ्यांकडे केली आहे. 18 जुलै रोजी शोपियनच्या अशिमपुरा येथे बनावट चकमकीत तीन मजुरांना अतिरेकी समजून ठार करण्यात आले होते. चकमकीनंतर कॅप्टन भूपिंदर आणि अन्य दोन सहकाऱ्यांनी त्या मजुरांच्या मृतदेहाजवळ शस्त्रे ठेवली व ते दहशतवादी असल्याचे भासवले होते. तसेच अधिकाऱ्यांना देखील यासंदर्भात खोटी माहिती पुरवली, असे एआयटीच्या पथकाने दाखल केलेल्या आरोपपत्रात म्हटले आहे.

त्यानंतर त्यांची छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. दरम्यान जम्मूच्या राजौरी जिल्ह्यातील मजुरांच्या कुटुंबियांनी त्यांची ओळख पटवली. मारले गेलेले मजूर हे कामानिमित्त शोपियन येथे गेले होते, असे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले. कुटुंबीयांनीही या प्रकरणाबद्दल तक्रार दाखल केली. त्यानंतर लष्कराने या कथित चकमकीची चौकशी सुरू केली होती. १८ सप्टेंबर रोजी भारतीय लष्कराने चकमकीदरम्यान सशस्त्र दल विशेष अधिकार कायदा १९९०चं उल्लंघन झाल्याचं मान्य करत शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश दिले होते. लष्कराच्या कोर्ट ऑफ इनक्वायरीत जवान ( violation of rules ) दोषी असल्याचं आढळून आले. त्यानंतर लष्कराने त्यांच्यावर कारवाईचे आदेश दिले.

दरम्यान, तपासादरम्यान पोलिसांनी २५ सप्टेंबर रोजी मृतांच्या डीएनएची चाचणी केली होती. तिघांचे डीएनए हे राजौरी येथील त्यांच्या कुटुंबीयांशी जुळणारे होते. त्यानंतर लष्कराने ठार करण्यात आलेले हे तिघे अतिरेकी नसून, कामासाठी अमशिपुरा येथे कामासाठी आले होते, असं समोर आलं. अबरार अहमद (वय २५), इम्तियाज अहमद (वय २०) आणि मोहम्मद इब्रार (वय १६) अशी या मजुरांची नावे होती. तब्बल ७० दिवसांनंतर ३ ऑक्टोबर रोजी त्यांचे मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांकडे सोपवण्यात आले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 28, 2020 4:12 pm

Web Title: fake encounter the soldiers killed the workers thinking they were terrorists then showed them as terrorists abn 97
Next Stories
1 ए. आर. रेहमान यांना मातृशोक; करीमा बेगम यांचे निधन
2 वुहाणमधील करोनाबद्दल वार्तांकन करणाऱ्या चिनी महिला पत्रकाराला चार वर्षांची शिक्षा
3 उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांना दिल्लीतील ‘एम्स’मध्ये हलवले
Just Now!
X