नोटाबंदीच्या निर्णयानंतर बनावट नोटांचा उद्योग पूर्णपणे बंद झाला आहे, असा दावा केंद्र सरकारने केला आहे. तब्बल ४०० कोटींच्या बनावट नोटा चलनात होत्या. त्यांची पाकिस्तान, बांगलादेश आणि नेपाळमध्ये तस्करी सुरू होती. मात्र, नोटाबंदीनंतर तस्करी बंद झाली आहे, असे केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीची घोषणा केल्यानंतर पाकिस्तान, बांगलादेश आणि नेपाळच्या आंतरराष्ट्रीय सीमेवरून होणारी बनावट नोटांची तस्करी पूर्णपणे थांबली आहे. देशभरात दरवर्षी जवळपास ७० कोटींच्या बनावट नोटा तस्करांमार्फत चलनात आणल्या जात होत्या, असेही रिजिजू यांनी सांगितले.

बनावट नोटांच्या तस्करीबरोबरच अंमली पदार्थ, शस्त्रांस्त्रांची तस्करीही पूर्णपणे ठप्प झाली आहे. हवालामार्फत होणारा व्यवहारही बंद झाला आहे. जूनपर्यंत सुरक्षा यंत्रणांनी १२.३५ कोटींच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. २०१५ मध्ये ३४.९९ कोटी रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. २०१४ मध्ये ३६.११ कोटी आणि २०१३ मध्ये ४२.९० कोटी रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत, अशी माहितीही रिजिजू यांनी दिली.

एका अहवालानुसार, भारतात जवळपास ७०० ते ८०० कोटी रुपयांचा पुरवठा दहशतवाद्यांना झाला आहे. त्यातील अंदाजे ३०० ते ४०० कोटी रुपये दरवर्षी नक्षलवाद्यांकडून वापरला जात आहे. काश्मीरमधील फुटीरवाद्यांना २० ते ३० कोटी रुपयांचा निधी पुरवला जातो. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, देशात जवळपास ४० हजार कोटींची रोकड काळ्या पैशांच्या स्वरुपात चलनात आहेत.