बनावट मुद्रांक घोटाळ्यातील मुख्य आरोपी अब्दुल करीम तेलगीची प्रकृती खालावली असून त्याच्यावर बेंगळुरुतील व्हिक्टोरिया रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तेलगीचे निधन झाल्याचे वृत्त निराधार असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे तेलगीच्या नातेवाईकांनी स्पष्ट केले.

बनावट मुद्रांक प्रकरणात तेलगी बेंगळुरुच्या कारागृहात शिक्षा भोगत आहे. नोव्हेंबर २००१ मध्ये राजस्थानच्या अजमेरमधून तेलगीला अटक करण्यात आली होती. बनावट मुद्रांक घोटाळ्याप्रकरणी तेलगीविरोधात देशभरात सुमारे ३५ गुन्हे दाखल आहेत. यातील काही गुन्ह्यांमध्ये त्याला जन्मठेपेची शिक्षाही झाली आहे. बनावट मुद्रांक घोटाळ्यातून तेलगीने बेळगावमधील खानापूरसह मुंबई, पुणे अशा विविध शहरांमध्ये कोट्यवधींची बेहिशेबी मालमत्ता जमा केली होती.

चार दिवसांपूर्वी तेलगीची प्रकृती खालावल्याने त्याला बेंगळुरुतील रुग्णालयात दाखल करण्यात आले. सोमवारी रात्री तेलगीचे निधन झाल्याचे वृत्त व्हायरल झाल्याने गोंधळ उडाळा. मात्र निधनाच्या बातम्या चुकीच्या आहेत, असे स्पष्टीकरण तेलगीचा जावई इरफान तालिकोटने दिले आहे. तेलगीला २० वर्षांपासून मधुमेह असल्याचे समजते. तेलगीवर अतिदक्षता विभागात उपचार सुरु असून त्याला व्हेंटिलेटर ठेवण्यात आले आहे, असे तालिकोटने सांगितले. तालिकोट हा खानापूरमधील युवक काँग्रेसचा पदाधिकारी आहे.