कर्नाटक विधानसभा निवडणुकीत मतदानाला अवघा एक दिवस उरलेला असताना पोलिसांनी बनावट मतदान ओळखपत्र प्रकरणात विद्यमान काँग्रेस आमदारासह १४ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दोन दिवसांपूर्वी बंगळुरुतील जालाहाल्ली भागातील एका अपार्टमेंटमधील घरातून जवळपास १० हजार बनावट मतदान ओळखपत्रे जप्त करण्यात आली होती.

पोलिसांनी या प्रकरणी राजा राजेश्वरी नगर मतदारसंघातील उमेदवार आणि काँग्रेसचे विद्यमान आमदार एन. मुनीरथना यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. सध्याच्या घडीला या प्रकरणावर काहीही बोलणे अयोग्य ठरेल. योग्यवेळी लोकांना यासंबंधी माहिती दिली जाईल असे मुख्य निवडणूक अधिकारी संजीव कुमार यांनी सांगितले.

मी मतदारसंघात मला मतदान करा, असा संदेश असलेली ४० हजार प्रसिद्धीपत्रके वाटली. तुम्हाला ही पत्रके प्रत्येक घरामध्ये मिळतील. ज्या फ्लॅटमध्ये बनावट मतदान ओळखपत्रे सापडली तिथे माझे प्रसिद्धी पत्रकही होते. म्हणून माझ्या नावाचा आरोपींमध्ये समावेश करण्यात आला. हे संतापजनक असून मला अपमानित करुन त्रास देण्याच्या प्रचारतंत्राचा एक भाग आहे असे मुनीरथना यांनी सांगितले.

निवडणूक आयोगाने याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. भाजपाने याप्रकरणी एका काँग्रेस नेत्यावर आरोप केले आहेत. हे अपार्टमेंट एका काँग्रेस नेत्याचे असल्याचे भाजपाने म्हटले आहे. राजा राजेश्वरी नगर मतदारसंघातील निवडणूक रद्द करण्याची मागणी भाजपाने निवडणूक आयोगाकडे केली आहे. तर काँग्रेसने भाजपाच्या आरोपाला प्रत्युत्तर दिले असून भाजपाचे हे नाटक असल्याचे म्हटले आहे. भाजपाने बनावट पुरावे गोळा केल्याचा आरोपही काँग्रेसकडून करण्यात आला आहे.