श्रीनगर : अनिवासी व्यक्तींना बनावट शस्त्रपरवाने देण्यात आल्याच्या प्रकरणी केंद्रीय गुप्तचर खात्याने ४० ठिकाणी छापे टाकले असून त्यात जम्मू-काश्मीर व दिल्लीचा समावेश आहे.  जम्मू, श्रीनगर, उधमपूर, राजौरी, अनंतनाग, बारामुल्ला, दिल्ली या ठिकाणी हे छापे टाकण्यात आले.

सीबीआयच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार  आयएएस अधिकारी शाहीद इक्बाल चौधरी व नीरज कुमार यांच्या मालमत्तांवर छापे टाकण्यात आले आहेत. सीबीआयने  डिसेंबरमध्ये या प्रकरणी जम्मू, श्रीनगर, गुरगाव, नॉइडा येथील जिल्हाधिकारी तसेच कुपवाडा, बारामुल्ला, उधमपूर, किश्तवार, शोपियाँ, राजौरी, दोडा, पुलवामा आदी  ठिकाणच्या दंडाधिकाऱ्यांवर छापे टाकले होते. दोन लाख शस्त्रपरवाने जम्मू-काश्मीरमधील विविध जिल्ह्यांत देण्यात आले असून त्या प्रकरणी चौकशी सुरू आहे. गैरमार्गाने हे परवाने देण्यात आले असे सांगण्यात येत आहे. राजस्थान एटीएसने २०१७ मध्ये असाच घोटाळा शोधून पन्नास जणांना बेकायदा शस्त्रपरवाना प्रकरणी अटक केली होती. त्यात तीन हजार शस्त्रपरवाने हे लष्करी जवानांच्या नावावर होते. जम्मू व काश्मीरचे राज्यपाल एन. एन. व्होरा यांनी हे प्रकरण चौकशीसाठी सीबीआयकडे दिले होते.