पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन आठवड्यापूर्वीच झारखंडची राजधानी रांची येथे केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा शुभारंभ केला. ही जगातील सर्वात मोठी सरकारी आरोग्य योजना असून जिचा ५० कोटी पेक्षा जास्त लोकांना फायदा होणार असल्याचा दावा केला जात आहे. सध्या या योजनेचा लाभ घेण्यासंदर्भातील एक मेसेज व्हॉट्स अॅपवर व्हायरल होत आहे. मात्र या मेसेजमध्ये व्हायरल होत असणारी आयुष्मान भारत योजनेची वेबसाईट खोटी असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. अनेकजण या महितीची सत्यता न तपासून पाहता हा मेसेज फॉरवर्ड करताना दिसत आहेत.

सध्या व्हॉट्स अॅपवर व्हायरल होणाऱ्या मेसेजमधील मजकूर पुढीलप्रमाणे आहे, ‘आयुष्मान भारत योजना 2018: 13 से 70 साल के 10 करोड़ लोगो को 5 लाख रुपये का निःशुल्क बीमा दिया जा रहा है। आवेदन करने की अंतिम तिथि 29 Oct है। तो जल्दी करें और इस मेसेज को अपने सभी दोस्तों को भी भेजें ताकि इस योजना का लाभ सभी को मिल सके| आवेदन करें https://ayushmaan-bharat.in’

मात्र सध्या अनेक व्हॉट्स अॅप ग्रुपमध्ये व्हायरल झालेला हा मेसेज आणि त्याबरोबरची लिंक संशयास्पद आहे. कारण या मेसेजच्या शेवटी देण्यात आलेली वेबसाईट ही आयुष्मान भारत योजनेची औपचारिक वेबसाईट नाहीय. आयुष्मान भारत योजनेची खरी वेबसाईट www.abnhpm.gov.in. ही आहे.

एसएमहॉक्ससॅलर या वेबसाईटवरील माहितीनुसार व्हायरल होत असलेल्या आयुष्मान भारतची खोटी वेबसाईटची नोंदणी ६ ऑक्टोबर रोजी करण्यात आली आहे. या डोमेननेमची (वेबसाईटचे नाव) नोंदणी अमेरिकेमधून करण्यात आली आहे. व्हायरल होणाऱ्या मेसेजमधील लिंकवर क्लिक केल्यास ओपन होणाऱ्या या वेबसाईटवर आधी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो आणि व्यक्तीची माहिती देण्यासाठीचा एक बॉक्स दिसतो. या वेबसाईटचा लूक सरकारच्या अधिकृत वेबसाईट सारखाच आहे. अनेकजण ही वेबसाईट खरी समजून आपले नाव, मोबाईल क्रमांक, पत्ता, वय अशी खाजगी माहिती या वेबसाईटला देतात. या माहितीचा उपयोग टेली मार्केंटिंगसाठी केला जात असल्याची शक्यता एसएमहॉक्ससॅलरने व्यक्त केली आहे. या वेबसाईटवरील जाहिराती आणि देण्यात येणारी माहिती विकून वेबसाईट तयार करणारे लोक पैसे कमवत असल्याचा संशयही एसएमहॉक्ससॅलरने व्यक्त केला आहे.

अनेकांनी या वेबसाईटवर माहिती दिल्यानंतर ही वेबसाईट तुमच्या इतर दहा व्हॉट्स अॅप ग्रुपवर शेअर करा असा मेसेज दाखवण्यात येत असल्याचे स्क्रीनशॉर्ट ट्विटवर शेअर केले आहेत.

तर काहींनी ही खोटी वेबसाईट असून यावर संबंधीत सरकारी यंत्रणांनी कारवाई करावी अशी मागणीही अनेक नेटकऱ्यांनी ट्विटरच्या माध्यमातून केली.