मलेशिया एअरलाइन्सचे एमएच-३७० हे विमान ‘बेपत्ता’ झाले असल्याचा निर्णय डिसेंबर महिन्यात घोषित करण्यात येणार असल्याचे एअरलाइन्सच्या एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितल्याने या विमानातील प्रवाशांच्या नातेवाईकांना धक्का बसला आहे, जवळपास आठ महिन्यांपूर्वी २३९ प्रवाशांना घेऊन जाणारे सदर विमान गूढरीत्या बेपत्ता झाले आहे.
मृतांच्या नातेवाईकांना किती नुकसानभरपाई द्यावयाची याचा तपशील मलेशिया आणि ऑस्ट्रेलिया सरकारचे अधिकारी एकत्रितपणे करीत आहेत. त्यामुळे पुढील महिन्यात सदर विमान बेपत्ता झाल्याची औपचारिक घोषणा करण्यात येईल, असे एअरलाइन्सचे वाणिज्यिक संचालक ह्य़ू डनलेव्ही यांनी म्हटल्याचे सांगण्यात येत आहे.सदर घोषणा निश्चित कधी करण्यात येणार आहे त्याची कल्पना नाही, मात्र एकदा नुकसानीची अधिकृत नोंद झाली की मृतांच्या कुटुंबीयांना पूर्ण नुकसानभरपाई देण्याबाबत पावले उचलता येऊ शकतील, असे डनलेव्ही यांनी म्हटल्याचे ‘द न्यूझीलंड हेराल्ड’ने म्हटले आहे.डनलेव्ही यांच्या वक्तव्यामुळे प्रवाशांच्या मृतांच्या कुटुंबीयांना धक्का बसला असून कुटुंबीयांच्या संघटनेतील काही जणांनी डनलेव्ही यांच्या हेतूबद्दलही शंका व्यक्त केली आहे.