गुरूवारी राज्यसभेत नागरिकत्व दुरूस्ती विधेयक मंजूर झालं. यापूर्वी लोकसभेतही हे विधेयक मंजूर करण्यात आलं होतं. राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर विधेयकाचे कायद्यात रुपांतर होईल. या विधेयकाला विरोधकांकडून तसंच देशातील काही राज्यांमधून विरोध करण्यात येत आहे. तर काही जणांनी नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाच्या घटनात्मकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. तर विरोध करणाऱ्यांनी हे विधेयक धर्माच्या आधारे भेदभाव करत असल्याचा आरोप केला आहे. परंतु दुसरीकडे भारतात आलेल्या शरणार्थींमध्ये मात्र या विधेयकाच्या मंजुरीनंतर आनंदाचं वातावरण पसरल्याचं पहायला मिळत आहे.

पाकिस्तानमधून भारतात आलेलं एक हिंदू कुटुंब नागरिकत्व दुरूस्ती विधेयक मंजूर झाल्यामुळे खुश झालं आहे. २०११ मध्ये हे कुटुंब पाकिस्तानातून भारतात आलं. परंतु या कुटुंबाला अद्याप भारताचं नागरिकत्व मिळालं नाही. पाकिस्तानातून भारतात आलेल्या या पती पत्नीला दोन लहान मुलंही आहे. मोठं बाळ हे दोन वर्षांचं तर लहान बाळ केवळ सहा महिन्यांचं आहे. सहा महिन्याच्या बाळाचं अद्यापही बारसं करण्यात आलं नव्हतं. परंतु हे विधेयक मंजूर झाल्यानंतर त्या बाळाचं बारसं करण्यात आलं. तसंच त्या बाळाला ‘नागरिकता’ हे नाव देण्यात आलं.

या विधेयकावर आपल्या कुटुंबाच भविष्य अवलंबून असल्याचं मत बाळाच्या आजीनं बोलताना व्यक्त केलं. या विधेयकानंतर आम्हाला भारताचं नागरिकत्व मिळेल या आशेनं आम्ही बाळाचं नाव ‘नागरिकता’ असं ठेवलं आहे. बाळाच्या जन्मापासूनच देशात या विधेयकावर चर्चा सुरू आहे म्हणून आम्ही बाळाचं नाव ‘नागरिकता’ असं ठेवण्याचा निर्णय घेतल्याचंही त्या म्हणाल्या.

नागरिकत्व दुरुस्ती विधेयक देशाच्या इतिहासात मैलाचा दगड ठरेल अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली होती. राज्यसभेत विधेयक मंजूर झाल्यानंतर त्यांनी सर्व खासदारांचे त्यांनी आभार मानले. “नागरिकत्व दुरुस्ती विधेयक देशाच्या इतिहासात मैलाचा दगड ठरेल. गेल्या कित्येक वर्षांपासून ज्यांच्यावर अन्याय झाला आहे अशा लोकांचं दु:ख या विधेयकामुळे दूर होईल,” असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं.