करोना विषाणूचा सामना करण्यासाठी सध्या केंद्र सरकारने ३ मे पर्यंत लॉकडाउन घोषित केलं आहे. या काळात सोशल मीडियावरुन अफवा पसरवणाऱ्याच्या प्रमाणातही खूप वाढ झाली आहे. झारखंडमधील रामगड जिल्ह्यातील एका कुटुंबाला अशाचं अफवेचं शिकार व्हावं लागलं आहे. मुरडीया गावातील एका कुटुंबावर गावकऱ्यांनी करोना झाल्याचा संशयावरुन बहिष्कार घातला आहे. इतकच नव्हे तर या कुटुंबाला गावातील विहीर आणि कुपनलिकेवर पाणी भरण्यासाठीही मनाई करण्यात आलेली आहे. हिंदुस्थान टाइम्सने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.

काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर पीडित कुटुंबातील मुलं भुकेने रडत असतानाचा एक व्हिडीओ समोर आला होता. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी या प्रकरणाची दखल घेतली असून, रामगड जिल्ह्याचे उप-जिल्हाधिकाऱ्यांना कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. पीडित कुटुंबातील महिला झारखंड सरकारच्या Didi Kitchen या उपक्रमात जेवण बनवण्याचं काम करते. लॉकडाउन काळात गरीब लोकांना जेवण पुरवण्याची जबाबदारी या विभागाकडे आहे. १८ एप्रिलला गावातील काही लोकं महिला काम करत असलेल्या केंद्रावर आले आणि त्यांनी महिलेला करोनी लागण झालेली आहे अशी अफवा पसरवायला सुरुवात केली. तुझ्या छत्तीसगडमधील भावाला करोना झालाय ज्यामुळे तुलाही करोनाची लागण झालेली आहे असा आरोप गावकऱ्यांनी केला.

प्रत्यक्षात माझा भाऊ माझ्या घरी गेल्या काही महिन्यांमध्ये आलेलाच नाही हे मी गावकऱ्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला…पण त्यांनी माझं काहीही ऐकलं नाही. महिलेचा पती मजुरी करत असल्यामुळे लॉकडाउन काळात त्याचा रोजगारही सुटलेला आहे. अशा परिस्थितीत या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. गावकरी आपल्याला पाणी भरायलाही देत नसल्याचं महिलेने यावेळी सांगितलं. गावकऱ्यांचं समाधान व्हावं यासाठी महिलेने जवळच्या गावात जाऊन करोनाची चाचणी करुन घेतली, या चाचणीचा अहवाल निगेटीव्ह आल्यानंतरही गावकरी आपल्याला गाव सोडून जाण्यास सांगत असल्याचं महिलेने सांगितलं. गावकरी या कुटुंबाला दैनंदिन कामासाठीही घराबाहेर पडू देत नाहीयेत.

या प्रकाराबद्दल महिलेने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर, पोलिसांनी घटनास्थळी पोहचत गावकऱ्यांना समज दिली आहे. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर या कुटुंबाला पाणी भरुन देण्यात आलेलं आहे. यानंतर अफवा पसरवून कुटुंबावा त्रास देण्यात आला तर संबंधितांवर कारवाई केली जाईल अशी माहिती स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांनी दिली आहे. मात्र यानंतरही गावकऱ्यांच्या वागण्यात काहीही फरक झालेला नसल्याचं महिलेने सांगितलं.