करोनामुळे अनेकांचे जीवन उद्धवस्त झाले. यामुळे सर्वाधिक फटका बसला तो रोजंदारीवर काम करणाऱ्या मजूरांना. उद्योग धंदे बंद असल्यामुळे अनेक कुटुंबांना पोट मारून जगावे लागले. तुटपुंजी सरकारी मदतीने यांचे पोटं भरले नाही. उत्तर प्रदेशातील अलिगड येथून एक आश्चर्यकारक प्रकरण समोर आले आहे. एक कुटुंब दोन महिन्यांपासून उपाशी आहे. दरम्यान, ५ मुले आणि एका महिलेसह संपूर्ण कुटुंबाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या धक्कादायक प्रकरणाने सर्वांना हादरवून सोडले आहे. एक महिला आणि तिची ५ मुले २ महिन्यांपासून अन्नासाठी तळमळत आहेत.

या महिलेच्या मोठ्या मुलीचे लग्न झाले आहे. तिला आणि तिच्या नवऱ्याला जेव्हा हे प्रकरण समजले. तेव्हा त्यांनी कुटुंबीयांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले, परंतु त्या लोकांची सुद्धा आर्थिक परिस्थिती चांगली नाही. रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांनी एका एनजीओला फोन केला. त्यानंतर स्वयंसेवी संस्था रुग्णालयातच पोहोचली आणि या लोकांना मदत केली.

हेही वाचा- करोना पॉझिटिव्ह सासऱ्याला पाठीवर घेऊन २ किमी अंतर पायी चालत सून पोहोचली रुग्णालयात; फोटो व्हायरल

उपासमारीमुळे संपूर्ण कुटुंबाची तब्येत बिघडली

या सहा जणांच्या कुटूंबाला कुणीतरी कधीकधी जेवण देत होतं. पण गेल्या १० दिवसांपासून या कुटुंबाने काहीच खाल्ले नाही. उपासमारीमुळे संपूर्ण कुटुंबाची तब्येत बिघडली. त्यामळे महिलेची मुलगी आणि एका स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने त्यांना मलखानसिंग जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

२० वर्षीय मुलाने मजुरी सुरू केली, पण…

४० वर्षीय महिलेचे म्हणणे आहे, तिच्या पतीचा दोन महिन्यांपूर्वी गंभीर आजारामुळे निधन झाला होता. तेव्हापासून संपूर्ण कुटुंब अन्नाच्या प्रत्येक धान्यासाठी आतुर आहेत. त्यानंतर कुटुंबाला पोसण्यासाठी तीने एका कारखान्यात चार हजार रुपयांची नोकरी सुरू केली. मात्र लाकडाउनमध्ये कारखाना काही काळाने बंद पडला. त्यांनी परत काम शोधले पण कोठेही काम मिळाले नाही. हळूहळू घरात ठेवलेले रेशनही संपू लागले आणि परिस्थिती इतकी बिकट झाली की या कुटुंबाला लोकांनी दिलेल्या पॅकेटवर अवलंबून राहावे लागले. लॉकडाउन उघडल्यानंतर या कुटुंबातील २० वर्षीय मुलाने मजुरी सुरू केली. ज्या दिवशी काम त्या दिवशी रेशन मिळत होते. मात्र काम नसतांना या कुटुंबाला उपाशी झोपावे लागत होते. महिलेच्या कुटुंबात चार मुले आणि एक मुलगी आहे, मुलगी १३ वर्षेाची आहे. याशिवाय मोठा मुलगा २०, दुसरा १५, तिसरा १० आणि सर्वात लहान मुलगा ५ वर्षांचा आहे.

हेही वाचा- कहर… गप्पा मारता मारता नर्सने पाच मिनिटांमध्ये एकाच व्यक्तीला दिले करोना लसीचे दोन डोस

तीन मुलांची प्रकृती चिंताजनक

दरम्यान, मलखानसिंग जिल्हा रुग्णालयाचे आपत्कालीन प्रभारी डॉ. अमित यांनी सांगितले की, एक महिला आणि तिच्या पाच मुलांना प्रभाग क्रमांक ८ मध्ये दाखल केले आहे. गेल्या दहा दिवसांपासून त्या लोकांनी काहीही खाल्ले नाही, त्यामुळे त्यांचे तब्येत खूपच खराब आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सध्या कुटुंबातील सर्व सदस्यांची प्रकृती ठीक नाही. तीन मुलांची प्रकृती चिंताजनक आहे, त्यांना लवकरच बरे केले जाईल.