भारतीय स्वातंत्र्यलढय़ात मोलाची भूमिका पार पाडणारे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूबाबतचा न्या. मुखर्जी आयोगाचा अहवाल हा विश्वासार्ह नसून त्यात कुठलीही माहिती, कारणे व परिस्थितीजन्य बाबी न सांगता निष्कर्ष काढण्यात आला आहे, अशी टीका नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या कुटुंबीयांनी केली आहे.

एका खुल्या पत्रात नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे नातेवाईक असलेल्या सूर्या बोस व माधुरी बोस यांनी म्हटले आहे की, न्या. मनोज कुमार मुखर्जी यांनी नेताजींचा मृत्यू अपघातात झाला नाही, असा अहवाल ८ नोव्हेंबर २००५ रोजी दिला होता. टोकियोतील रेणकोजी मंदिरात ज्या अस्थी आहेत त्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या नाहीत, असेही त्या अहवालात म्हटले होते.

१९९९ मध्ये नेमण्यात आलेल्या मुखर्जी आयोगाने बोस यांच्या मृत्यूबाबत स्पष्टीकरण केलेले नाही. त्यांचा मृत्यू विमान अपघातात झाला नाही तर मग आणखी कुठे व केव्हा व कसा झाला याचा उल्लेख त्यात नाही.

बोस यांच्या कुटुंबातील सदस्यांनी हे पत्र २४ ऑगस्ट रोजी लिहिले आहे. न्या. मुखर्जी यांनी नेताजी सुभाष चंद्र बोस यांचा मृत्यू झाला एवढाच निष्कर्ष काढला असून तैवानमध्ये विमान अपघातच झाला नाही, त्यामुळे नेताजींचा मृत्यू त्यात होण्याची शक्यताच नाही, असे अहवालात म्हटले आहे ते विश्वासार्ह नाही.

नेताजींचा मृत्यू १८ ऑगस्ट १९४५ रोजी तैवान येथे विमान अपघातात झाल्याचे जपान सरकारने म्हटल्याच्या घटनेला आता ७५ वर्षे उलटली आहेत पण अजूनही त्यांचे नेमके काय झाले हा प्रश्न अनुत्तरित आहे. रेणकोजी मंदिरात नेताजींचे जे अवशेष ठेवले आहेत, त्याची डीएनए चाचणी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

मुखर्जी आयोगाकडेही ही मागणी करण्यात आली होती पण त्यांनी त्यावर कृती केली नाही. रेणकोजी मंदिराचे अधिकारी पूर्ण सहकार्य करण्यास तयार होते पण मुखर्जी यांनी डीएनए चाचणी करण्यासाठी उपाययोजना केल्या नाहीत. डीएनए चाचणी शक्य आहे की नाही हेही तपासून पाहिले नाही. गेल्या पंधरा वर्षांतील विज्ञानाची प्रगती बघता आता डीएनए चाचणी करणे शक्य आहे. १७ मे २००६ रोजी मुखर्जी अहवाल संसदेत मांडण्यात आला होता.

राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर नेताजींचा मृत्यू किंवा बेपत्ता होणे यावर किमान दहा चौकशा झाल्या आहेत. तैहोकू विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाला. १९५६ मध्ये  शहानवाझ समिती व १९७४ मध्ये खोसला आयोगाने याबाबत चौकशी केली होती. त्यांनी नेताजींचा मृत्यू तैहोकू या तैवानमधील शहरातील लष्करी रुग्णालयात १८ ऑगस्ट १९४५ रोजी झाल्याचे म्हटले होते. विमान अपघातात मृत्यूनंतर त्यांची रक्षा जपानमधील टोकियो येथे रेणकोजी मंदिरात ठेवण्यात आली. २०१७ मध्ये संसदेत केंद्राने असे सांगितले की, १९४५ मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा विमान अपघातात मृत्यू झाला. केंद्र सरकार व पश्चिम बंगाल सरकारने बोस यांच्याबाबतची काही वर्गीकृत कागदपत्रे खुली केली होती.