पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या उत्तर प्रदेशातील दोन सीआरपीएफ जवानांच्या कुटुंबीयांने भारतीय हवाई दलाने पाकिस्तानात घुसून केलेल्या कारवाईचे पुरावे मागितले आहेत. भारताने केलेल्या एअर स्ट्राइकमध्ये नेमके किती दहशतवादी मारले गेल आहेत यावरुन विरोधक प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. यादरम्यान शहीद जवानांच्या कुटुंबीयांनी ही मागणी केली आहे.

14 फेब्रुवारीला जैश-ए-मोहम्मदने सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला केला होता. या हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले होते. यामध्ये प्रदीप कुमार आणि राम वकील यांचाही समावेश होता. यानंतर भारताने प्रत्युत्तर देत पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले होते. 26 फेब्रुवारीला भारताने एअर स्ट्राइक केला होता. यावेळी जवळपास 350 दहशतवादी ठार झाल्याचं बोललं जात होतं. मात्र आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी मृतांच्या आकड्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं.

सध्या केंद्र सरकार आणि विरोधकांमध्ये बालाकोटवरुन शाब्दिक चकमक रंगली असताना दोन शहीद जवानांच्या कुटुंबीयांनी एअर स्ट्राइकमुळे नेमका काय परिणाम झाला याचे पुरावे मागितले आहेत. मृतांच्या आकड्यांसंबंधी कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मंत्र्यांनी वेगवेगळी आकडेवारी दिली असून भारतीय हवाई दलाने मृतदेह मोजणं आपलं काम नसल्याचं म्हटलं आहे.

‘ज्याप्रमाणे पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर आम्हाला मृतदेह पहायला मिळाले, त्याचप्रमाणे आम्हाला त्यांचेही मृतदेह पहायचे आहेत. दहशतवादी हल्ल्यानंतर लगेचच जबाबदारी घेण्य़ात आली होती. एअर स्ट्राइक झाला आहे यामध्ये काही दुमत नाही, पण त्यामुळे किती नुकसान झालं ? याचा स्पष्ट पुरावा असला पाहिजे. जर पुरावाच नसेल तर आम्ही विश्वास कसा ठेवायचा ? पाकिस्तान काहीच नुकसान झालं नसल्याचा दावा करत असताना आपल्याकडे पुरावाच नसेल तर विश्वास कसा ठेवणार’, अशी विचारणा शहीद जवाना राम वकील यांची बहिण राम रक्षा यांनी विचारला आहे.

पुरावा पाहिल्याशिवाय आम्हाला शांती मिळणार नाही आणि माझ्या भावाच्या मृत्यूचा बदला घेतला आहे याची खात्रीही पटणार नाही असंही त्यांनी म्हटलं आहे.

शहीद जवान प्रदीप कुमार यांच्या आईनेही पुराव्यांची मागणी केली आहे. ‘आम्ही संतृष्ट नाही आहोत. किती मुलांचा मृत्यू झाला आहे. दुसऱ्या बाजूला एकही मृतदेह दिसलेला नाही. खरंतर कोणतीही खात्रीलायक बातमी नाही आहे. आम्ही हे टीव्हीवर पाहणं गरजेचं आहे. आम्हाला दहशतवाद्यांचे मृतदेह पहायचे आहेत’, अशी मागणी 80 वर्षीय सुलेलता यांनी केली आहे.