भारतीय लष्करातील जवान तीन महिन्यांपासून बेपत्ता असून त्याचा शोध घेण्यासाठी कोणीही आपल्या मदतीला पुढे आलं नाही अशी व्यथा त्याच्या कुटुंबीयांनी मांडली आहे. शाकीर असं या २४ वर्षीय भारतीय जवानाचं नाव आहे. शाकीर लष्करात रायफलमन म्हणून कार्यरत होता. तीन महिन्यांपूर्वी काश्मीरमधील शोपियन येथे कुटुंबासोबत ईद साजरी करण्यासाठी येत असताना दहशतवाद्यांनी त्याचं अपहरण केल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कुलगाम जिल्ह्यात शाकीरची कार जळालेल्या अवस्थेत आढळली होती. इंडिया टुडेने यासंबंधी वृत्त दिलं आहे.

शाकीरचे कुटुंबीय सतत त्याचा शोध घेत आहेत. आपण मदतीसाठी सर्व दरवाजे ठोठावले, पण कोणीच पुढे आलं नाही असं कुटुंबीयाचं म्हणणं आहे. शाकीर जिवंत आहे की मृत्यू झाला आहे किमान इतकी तरी माहिती आम्हाला द्यावी अशी विनंती कुटुंबीय करत आहेत.

“मदतीसाठी आम्ही सर्व दरवाजे ठोठावले, अधिकाऱ्यांकडे पोहोचलो. पण कोणीही मदत करण्यास तयार नाही. तो जिवंत आहे का हेदेखील माहिती नाही. जर त्याची हत्या झाली असेल तर त्याचा मृतदेह कुठे आहे. कृपया आम्हाला सांगा…आजपर्यंत मला पोलीस किंवा इतर कोणाकडूनही शाकीरसंबंधी काही माहिती मिळालेली नाही. आम्हाला मदत करावी असं आवाहन आम्ही सर्वांना करतोय,” असं शाकीरच्या वडिलांनी म्हटलं आहे.

घराजवळ शाकीरचे रक्ताने माखलेले कपडे सापडल्याचं कुटुंबाने सांगितलं आहे. दहशतवाद्यांनी शाकीरचं अपहरण केल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. त्याला एका दुसऱ्या गावात नेण्यात आल्याचाही दावा पोलिसांनी केला होता. “आम्ही सर्व ठिकाणी पाहिलं. पाच ते सहा दिवसांसाठी मुलाला एका दुसऱ्या गावात नेल्याचं मी ऐकलं, पण मदतीला कोणीच आलं नाही,” असं शाकीरच्या वडिलांचं म्हणणं आहे.