घटस्फोटासाठी अर्ज दाखल केल्यानंतर लालू प्रसाद यादव यांचा मोठा मुलगा तेज प्रताप यादव याने आपल्याच कुटुंबाविरोधात बंड पुकारण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्या नात्यात दुरावा येण्यामागे दुसरं कोणी नाही तर आपलं कुटुंब जबाबदार असल्याचं तेज प्रताप यादव याचं म्हणणं आहे. इतकंच नाही तर आपल्याविरोधात कट आखला जात असल्याचा आरोपही त्याने केला आहे.

‘कुटुंबातील प्रत्येक जण ऐश्वर्याला पाठिंबा देत आहे. मी गेल्या दिड महिन्यांपासून तिच्या संपर्कात नव्हतो. पण अचानक ती पुन्हा घरी परत आली असून माझ्या कुटंबीयांकडून तिला समर्थन मिळत आहे. या सगळ्यामागे मोठा कट आहे, आणि माझे कुटुंबीय त्यात सहभागी आहेत’, असं तेज प्रताप यादवने म्हटलं आहे.

इच्छेविरुद्ध ऐश्वर्या राय बरोबर केलं लग्न

पाटणा न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केल्यानंतर तेज प्रताप यादव याने दुसऱ्या दिवशी आपले वडील आणि राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांची रांचीतील रुग्णालयात जाऊन भेट घेतली. लालू यादव यांचादेखील तेज प्रतापला पाठिंबा नसल्याचं दिसत आहे. मात्र तेज प्रतापने आपला निर्णय ठरवला आहे. ‘वडिलांनी मला थोडं थांबण्याचा सल्ला दिला आहे, पण मी माझा निर्णय बदलणार नाही’, असं तेज प्रताप यादव बोलले आहेत.

याआधी तेज प्रतापने मी एक साधाभोळा माणूस आहे. इच्छेविरुद्ध माझं ऐश्वर्या राय बरोबर जबरदस्तीने लग्न लावण्यात आलं. तेव्हापासून माझा कोंडमारा सुरु होता असे म्हटलं होतं.

ऐश्वर्या राय राजकारणात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु असताना अचानक हे घटस्फोटाचे वृत्त आले आहे. ऐश्वर्या सुद्धा राजकीय कुटुंबातून असून २०१९ लोकसभा निवडणुकीत ऐश्वर्याला सारण लोकसभा मतदारसंघातून तिकिट दिले जाईल अशी चर्चा होती. ऐश्वर्या राष्ट्रीय जनता दलाचे आमदार आणि बिहारचे माजी वाहतूक मंत्री चंद्रिका राय यांची मोठी मुलगी आहे. चंद्रिका राय हे बिहारचे माजी मुख्यमंत्री दरोगा प्रसाद राय यांचे सुपूत्र आहेत. दरोगा बिहारचे १० वे मुख्यमंत्री होते. १६ फेब्रुवारी १९७० ते २२ डिसेंबर १९७० पर्यंत त्यांनी बिहारचे मुख्यमंत्रीपद भूषवले.