News Flash

पृथ्वीला प्रदक्षिणा मारणारे पहिले अमेरिकन जॉन ग्लेन यांचे निधन

एक योद्धा वैमानिक, अंतराळवीर आणि राजकारणी म्हणून त्यांची कारकीर्द गाजली

famous austronaut john glenn died; ग्लेन यांची कारकीर्द स्वप्नवत होती

पृथ्वीला प्रदक्षिणा मारणारे पहिले अमेरिकन अंतराळवीर जॉन ग्लेन यांचे ९५ व्या वर्षी निधन झाले. १९६२ साली त्यांनी केलेल्या अवकाश प्रवासामुळे ते अमेरिकन लोकांच्या घराघरात पोहचले होते. त्यांचा करिश्मा इतका होता की अंतराळवीर म्हणून निवृत्त झाल्यावर ते अनेक वर्षे लोकप्रिय सिनेट म्हणून देखील नावाजले गेले. मर्क्युरी ७ या अवकाश यानातून प्रवास केलेले ते शेवटचे अंतराळवीर होते.

कोलम्बस येथील जेम्स कॅन्सर हॉस्पिटलमध्ये त्यांचे गुरुवारी निधन झाले. गेल्या आठवड्यामध्ये ते रुग्णालयात दाखल झाले होते.जॉन ग्लेन यांची कारकीर्द स्वप्नवतच आहे. अंतराळवीर होण्याआधी ते फायटर पायलट होते, त्यांनी दोन युद्धामध्ये आपली सेवा प्रदान केली होती. त्यांच्या नावावर उड्डाणाचे अनेक विक्रम आहेत.

त्यानंतर ते यशस्वी अंतराळवीर झाले आणि तेथून निवृत्त झाल्यावर ओहियोचे प्रतिनिधी म्हणून ते २४ वर्षे सिनेटमध्ये होते. एक योद्धा, अंतराळवीर आणि राजकारणी म्हणून त्यांची कारकीर्द गाजली. राजकारणात गेल्यावर देखील त्यांचा अंतराळवीराचा पिंड त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता. वयाच्या ७७ व्या वर्षी त्यांनी डिस्कवरी यानातून अंतराळ प्रवास केला आणि ते अमेरिकेतील सर्वात वृद्ध अंतराळवीर देखील ठरले.

अमेरिकेच्या जडण-घडणीमध्ये मोठा वाटा असलेल्या लोकांपैकी ते एक आहेत. ते सर्वार्थाने अमेरिकन लोकांचे हिरो होते. सोवियत युनियनने १९५७ साली पहिला स्पुतनिक १ उपग्रह प्रक्षेपित केला होता. त्यानंतर १९६१ ला युरी गगारीन हा जगातील पहिला अंतराळवीर ठरला ज्याने पृथ्वीला प्रदक्षिणा मारली. त्यानंतर अमेरिकेने देखील आपल्या अंतराळ मोहिमेवर गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आणि १९६२ मध्ये ग्लेन पृथ्वीला प्रदक्षिणा मारणारे पहिले अवकाशवीर ठरले.

२०१२ साली मर्क्युरी ७ च्या प्रवासाला पन्नास वर्षे पूर्ण झाली होती. त्यावेळी असोसिएटेड प्रेसने घेतलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी अनेक मुद्दांवर बातचीत केली. नासाचा आतापर्यंतचा प्रवास, आव्हाने सर्व विषयांवर त्यांनी प्रदीर्घ चर्चा केली. तसेच, अद्यापही आपल्याला मर्क्युरी ७ चा थरार जशास तसा आठवतो असे ते म्हणाले. जेव्हा देखील मला हे आठवते तेव्हा माझ्या अंगावर शहारे येतात असे ते म्हणाले होते.

अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. ग्लेन यांनी अनेक पिढ्यांना प्रेरणा दिल्याचे ते म्हणाले. ते सदैव आमच्या आठवणीत राहतील असे ट्रम्प यांनी ट्विट केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 9, 2016 11:05 am

Web Title: famous austronaut john glenn died
Next Stories
1 पंतप्रधान मोदींनी सोनिया गांधींना दिल्या दिर्घायुष्याच्या शुभेच्छा
2 Black Money in India: नोटाबंदीनंतरची सर्वात मोठी कारवाई, १७० कोटींची रोकड जप्त
3 सॉलोमन बेटाला ७.७ रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का
Just Now!
X