रिबेका मरीन या सुप्रिसद्ध मॉडेलने कृत्रीम सोनेरी हात जोडत लग्न केले. रिबेका मरीनला जन्मत:च कोपरापासून एक हात नाही. तिने विविध प्रकारचे बायोनिक हात जोडत आपल्या अपंगत्त्वावर मात केली आहे. लग्नाच्या वेळी तिने जोडलेल्या सोनेरी हाताची चर्चा चांगलीच रंगली होती. आपल्या प्रियकरासोबत लग्न करताना तिने कृत्रीम सोनेरी हात जोडत लग्न केले. त्यामुळे या दोघांचेही लग्न अत्यंत खास आणि चर्चेचा विषय ठरले.

आमच्या लग्नाला जे लोक आले होते त्यांचे आणि जगाचे लक्ष या हाताकडे वेधले जावे म्हणून मी कृत्रीम सोनेरी हात जोडला होता असे रिबेका मरिनने म्हटले आहे. लोकांनी माझ्या हाताकडे पाहावे आणि त्याची चर्चा करावी असे मला वाटत होते. माझ्या नसलेल्या हाताचाही मला प्रचंड अभिमान आहे म्हणून त्याला पर्याय स्वीकारत कृत्रीम सोनेरी हात जोडत लग्न केले असेही रिबेकाने म्हटले आहे. तिच्या लग्नाचे फोटो इंस्टाग्रामवर आणि इतर सोशल साइट्सवर चांगलेच व्हायरल झाले आहेत. आपल्याला अशा पद्धतीने लग्न करून खूप आनंद झाला असे मरीनने म्हटले आहे.

हात नसल्याने मी कधीही स्वतःला कमी लेखले नाही. मला इतर लोकांप्रमाणेच आयुष्य जगायचे होते आणि बायोनिक हातांचा पर्याय निवडत मी तसेच आयुष्य जगते आहे असेही रिबेकाने म्हटले आहे. जेव्हा आपण आपल्या भीतीवर मात करतो, तिला हरवतो तेव्हा सगळे जग आपले कौतुक करते. मी शाळेत आणि कॉलेजमध्ये जायचे तेव्हा माझ्या हाताकडे लोक विचित्र नजरेने बघायचे त्या नजरांची मला सुरुवातीला भीती वाटली पण नंतर किळस येऊ लागली आणि मी माझ्या भीतीवर आणि अपंगत्त्वावर मात केली असेही रिबेकाने स्पष्ट केले.