करोना विषाणूचा संसर्ग देशभरात अद्यापही झपाट्याने वाढताना दिसत आहे. करोनाच्या विळख्यात सर्वसामान्य नागरिकांपासून अगदी व्हीव्हीआयपी पर्यंत सर्वचजण सापडत असल्याचे आतापर्यंत दिसून आले आहे. आता प्रसिद्ध शायर राहत इंदौरी यांना देखील करोनाचा संसर्ग झाला असल्याचे समोर आले आहे. त्यांनी स्वतः ट्विटद्वारे याबाबत माहिती दिली आहे.

“कोविडची सुरुवातीची लक्षणं आढळून आल्याने मी काल तपासणी करून घेतली, ज्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. अरविंदो रुग्णालयात मी उपचार घेत आहे. प्रार्थना करा की लवकरात लवकर मला या आजाराला हरवता येईल. आणखी एक विनंती आहे, कृपया कोणीही मला किंवा माझ्या कुटुंबीयांना फोन करू नये, माझ्या प्रकृतीबाबतची माहिती आपल्याला ट्विटर व फेसबुकद्वारे मिळत राहील.” असे त्यांनी ट्वटिद्वारे सांगितले आहे.

प्रसिद्ध शायर राहत इंदौरी हे करोनाग्रस्त रुग्णांच्या मदतीसाठी या अगोदर धावून आले होते. त्यांनी करोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी जागा अपुरी पडत असल्यास स्वतःच घर देखील वापरण्यास देण्याची तयारी दर्शवली होती.

‘पंतप्रधान नरेंद्र मोदीजी व शिवराज सिंह चौहानजी, परमेश्वराने देशामधील करोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढू देऊ नये. पण, जर वाढलीच आणि इंदौरमध्ये रुग्णांना विलगीकरणासाठी जागेची गरज असेल तर माझं घर तयार आहे. ईश्वर आपल्या सगळ्यांचं या संकटापासून रक्षण करो,’ असं त्यांनी ट्विट करून म्हटलं होतं.

काही महिन्यांपूर्वी त्यांचा ‘बुलाती है मगर जाने का नहीं’ हा शेर खूप चर्चेत आला होता. सोशल मीडियावर या शेरनं अक्षरशः धुमाकूळचं घातला होता.