फरीदाबादमध्ये अत्यंत धक्कादायक आणि गंभीर प्रकार समोर आला आहे. येथे नुकत्याच जन्मलेल्या बाळाला आई-वडिलांनी दुधाऐवजी चक्क चहा-कॉफी यांसारखे पेय दिल्याने बाळाचा मृत्यू झाला.

‘फरीदाबाद येथील रहिवासी सपना यांची मुलगी तीन दिवसांची होती. जन्मापासूनच त्या चिमुकलीला चहा,कॉफी,दही, दूध पाजलं जात होतं परिणामी तिच्या फुफ्फुसात संसर्ग झाला होता. प्रकृती खराब झाल्यामुळे कुटुंबीयांनी चिमुकलीला फरीदाबादच्या बी.के. हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केलं होतं. मात्र प्रकृती गंभीर असल्यामुळे दिल्लीतील रुग्णालयात नेण्यात यावं असं डॉक्टरांकडून सुचवण्यात आलं. पण कुटुंबीयांनी दुर्लक्ष केलं आणि चिमुकलीला दिल्लीच्या रुग्णालयात घेऊन गेले नाहीत. अखेर बुधवारी त्या चिमुकलीचा मृत्यू झाला’ अशी माहिती बी.के हॉस्पीटलच्या नीकू वॉर्डमधील डॉक्टर मेधा यांनी दिली. ‘नवभारत टाइम्स’ने याबाबतचं वृत्त दिलं आहे.

जन्मापासूनच त्या चिमुकलीला कुटुंबीयांनी चहा, दही, कॉफी अशाप्रकारची पेय पाजली जात होती, असं डॉक्टरांनी सांगितलं. संसर्ग झाल्याने चिमुकलीला श्वास घेण्यास त्रास होत होता. उपचारासाठी तिला तातडीने बी.के. हॉस्पीटलच्या पहिल्या मजल्यावरील नीकू वॉर्डमध्ये दाखल करण्यात आलं. तेथे जवळपास 24 तास डॉक्टरांनी तिच्यावर उपचार केले. पण तिची प्रकृती गंभीर असल्याची माहिती कुटुंबीयांना देण्यात आली होती. अखेर बुधवारी सकाळच्या सुमारास चिमुकलीचा मृत्यू झाला, अशी माहिती येथील डॉक्टरांनी दिली.