लसणाला अवघा ४ रूपये हमीभाव मिळाल्याचं ऐकताच  शेतकऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला आहे. राजस्थानच्या कोटामध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. सत्यनारायण मीना हा ३२ वर्षांचा शेतकरी कोटाच्या बाजारसमितीत शेतात पिकवलेला लसूण घेऊन आला होता. मात्र अवघा ४ रूपये हमीभाव मिळाल्याचं त्याने ऐकले आणि तो जागीच कोसळला. राजस्थानच्या रोईन या गावात सत्यनारायण वास्तव्यास होता आणि तिथेच त्याची शेतीही होती. तो जेव्हा जागेवरच कोसळला तेव्हा त्याला तातडीने कोटामधल्या सरकारी दवाखान्यात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तिथेच त्याला मृत घोषित केले.

शेतकरी शेतात घाम गाळून कष्ट करून पिक आणतो.. मात्र बाजार समित्यांमध्ये त्याची अशी क्रूर थट्टा होते. अवघ्या ३२ वर्षांच्या शेतकऱ्याला जिथे हा झटका सहन झाला नाही तिथे इतर शेतकऱ्यांचे काय होत असेल त्याचा विचारच केलेला बरा. निदान या शेतकऱ्याच्या मृत्यू तरी सरकारला जाग आणेल का असा प्रश्न आता इतर शेतकरी विचारत आहेत.

सध्या महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि राजस्थानसह देशातले शेतकरी हवालदिल झाले आहेत. महााष्ट्रात शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि शेतमालाला मिळणारा अयोग्य हमीभाव याविरोधात आंदोलन सुरू आहे. कर्जमाफी देऊ अशी घोषणा महाराष्ट्र सरकारने केली आहे. तरीही शेतकऱ्यांचा संघर्ष काही संपलेला नाही. तसेच मध्यप्रदेशातही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून संघर्ष सुरूच आहे. मध्यप्रदेशात कर्जमाफी मागण्याऱ्या शेतकऱ्यांवर गोळीबार झाला आहे. या सगळ्याची झळ शेतकऱ्यांना बसतेच आहे. तसेच शेतकरी मोठ्या प्रमाणावर आत्महत्याही करत आहेत. रोज शेतकरी मृत्यूला कवटाळत आहेत. सरकार मात्र या सगळ्याकडे लक्ष द्यायला तयार नाहीये. कर्जमाफी होणार की नाही ? हा प्रश्न अद्यापही अनुत्तरीतच आहे. अशात  राजस्थानच्या कोटामध्ये लसणाला अवघा चार रूपये हमी भाव मिळाल्याने शेतकऱ्याचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला आहे. शेतकरी किती मानसिक दबावाखाली आहे हे दिसण्यासाठी सरकारला आणखी कोणत्या उदाहरणाची आवश्यकता आहे? असा प्रश्न आता लोक विचारू लागले आहेत.