दिल्लीच्या वेशींवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनासाठी राजकीय पक्षांचा पािठबा मिळवण्याच्या कथित प्रयत्नात सहभागी न होण्याचा निर्णय संयुक्त किसान मोर्चाने घेतला असला तरी, हा विरोध मोडून मोर्चाचे सदस्य व हरियाणातील प्रमुख शेतकरी नेते गुरुनाम सिंग चडूनी यांनी राजकीय बैठक बोलावली होती. त्यांच्या या शिस्तभंगामुळे मोर्चामध्ये झालेले मतभेद गुरुनाम यांच्या माघारीनंतर अखेर सोमवारी रात्री संपुष्टात आले.

गुरुनाम सिंग यांनी राजकीय पक्षांना पत्र लिहून समर्थन देण्याची विनंती केली व रविवारी दिल्लीत यासंदर्भातील बैठक घेतली होती. या बैठकीसाठी काँग्रेस, आप तसेच, अन्य पक्षांच्या नेत्यांना व शेती तज्ज्ञांना बोलावले होते, अशी माहिती एका निमंत्रिताने दिली. या राजकीय प्रयत्नांना मोर्चाने विरोध केला असून ‘गुरुनाम सिंग यांनी बोलावलेल्या सर्व राजकीय पक्षांच्या बैठकीशी संबंध नाही’, असे निवेदन संयुक्त किसान मोर्चाने सोमवारी प्रसिद्ध केले. या निवेदनावर मोर्चाचे सदस्य दर्शन पाल, बलबीर सिंग राजेवाल, जगजीत सिंग दल्लेवाला, शिवकुमार कक्काजी, हन्नान मोल्ला आणि योगेंद्र यादव यांच्या नावांचा समावेश आहे.

महिलांचा वाढता सहभाग

शेतकरी आंदोलनात महिलांचा सहभाग वाढू लागला असून सोमवारी, किसान महिला दिवस साजरा करण्यात आला. राजस्थानच्या सीमेवर शहाजहाँपूरच्या आंदोलनस्थळी महाराष्ट्रातून लोकसंघर्ष मोर्चाचे सुमारे एक हजार शेतकरी-आदिवासी पोहोचले असून त्यात पाचशेहून अधिक महिलांचा समावेश आहे. शहाजहाँपूर येथे महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशमधून हजारो महिला आंदोलनात सहभागी झाल्या आहेत.

राजकीय समर्थनासाठी गाठीभेटी

महाराष्ट्रात संयुक्त शेतकरी कामगार मोर्चाच्या शिष्टमंडळाने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, पर्यावरण व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेतली होती व २५ जानेवारी रोजी मुंबईत राजभवनावर काढण्यात येणाऱ्या मोर्चाला पािठबा देण्याची व त्यात सहभागी होण्याची विनंतीही केली होती. राज्यातील या मोर्चाच्या वतीने २३ ते २६ जानेवारी या चार दिवसांमध्ये आंदोलन केले जाणार आहे. अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती, कामगार संघटना संयुक्त कृती समिती, जनआंदोलनांची संघर्ष समिती, नेशन फॉर फार्मर्स आणि हम भारत के लोग या पाच मंचाच्या वतीने हे आंदोलन होणार आहे.