कृषी कायद्यांना विरोध करणारे शेतकरी मागील महिन्याभारपासून दिल्लीच्या सीमांजवळ आंदोलन करत आहेत. अनेकदा सरकारसोबत चर्चेच्या बैठकी घेऊनही सर्व चर्चा निष्फळ ठरल्याचे चित्र दिसत आहे. आता या शेतकरी आंदोलनावरुन सत्ताधारी भाजपा आणि प्रमुख विरोधक असणाऱ्या काँग्रेसदरम्यान आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. मात्र या आंदोलनावरुन सुरु झालेल्या राजकारणावरुन आता शेतकरी नेत्याने देशातील दोन्ही प्रमुख पक्षांना खडे बोल सुनावले आहेत. राजकारणी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करुन शेतकऱ्याला मूळ मुद्द्यापासून दूर लोटत असल्याचा टोला शेतकरी नेते गुरनाम सिंह चढूनी यांनी लगावला आहे. एनडीटीव्हीशी बोलताना त्यांनी या मुद्द्यावरुन राजकारण करणाऱ्या भाजपा आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी शेतकऱ्यांसाठी काहीही केलेलं नाही असंही सिंह म्हणाले आहेत.

नक्की पाहा >> मोदी सरकारच्या काळात अदानींच्या २१ कंपन्यांना मंजूरी; जाणून घ्या Adani Agri Logistics आहे तरी काय?

नेते मंडळी एकमेकांवर आरोपप्रत्यारोप करुन शेतकऱ्यांना मूळ मुद्द्यापासून दूर भटवण्याचं काम करतात. ना काँग्रेसने शेतकऱ्यांसाठी काही केलं ना भाजपाने शेतकऱ्यांसाठी काही केलं, असं रोखठोक मत सिंह यांनी व्यक्त केलं आहे. तसेच पुढे बोलताना दोन्ही पक्ष देणगीच्या नावाखाली कॉर्पोरेट क्षेत्राकडून पैसे घेत असल्याने कोणीच स्वच्छ नियत असणारं नाहीय अशी टीकाही सिंह यांनी केलीय. “दोन्ही पक्ष कॉर्पोरेट क्षेत्राकडून निधी देणगी म्हणून घेतात. मी तर त्याला लाच असं म्हणतो. राजकीय पक्ष त्याला देणगी म्हणतात. जर भाजपाने एक हजार कोटी घेतले तर ५०० कोटी काँग्रेसनेही घेतलेत. कोणीही दूध से धुले म्हणजेच स्वच्छ नियत असणारे नाहीयत. आपल्या देशात पैशाने सत्ता विकत घेतली जाते. सत्तेत आल्यावर पुन्हा पैसा आणि पैशातून पुन्हा सत्ता असं काळचक्र सुरु असतं,” अशा शब्दांमध्ये सिंह यांनी राजकीय पक्षांना फैलावर घेतलं.

नक्की वाचा >> अक्रोड-पिस्ते खाणारे, मशिनने मसाज करणारे आंदोलक यापूर्वी पाहिले नाहीत : प्रवीण दरेकर

नक्की वाचा >> “जोपर्यंत मोदी पंतप्रधान आहेत तोपर्यंत कोणतीही कॉर्पोरेट कंपनी…”; शाह यांनी शेतकऱ्यांना दिला शब्द

“या चक्रमध्ये शेतकरी भरडला जात आहे. हे म्हणजे (संरक्षणासाठी असणारा) कुत्रा आणि चोर एकत्र आल्यासारखं आहे. आपल्या देशात एका व्यक्तीची कमाई तासाला ९० कोटी रुपये आहे तर दुसऱ्याची तासाला ९ रुपये पण नाही. आपला देश सोने की चिड़िया होता ना? आता तर मातीची पण राहीला नाही. हीच आमची लढाई आहे. ही केवळ शेतकऱ्यांची नाही तर सर्वसामान्यांची लढाई आहे,” असा टोलाही सिंह यांनी लगावला आहे. मार्च महिन्यामध्ये लॉकडाउन सुरु झाल्यापासून रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वोसर्वा अनिल अंबानी यांच्या संपत्तीमध्ये तासाला ९० कोटींची वाढ होत असल्याचा अहवाल सप्टेंबर महिन्यामध्ये प्रकाशित झाला होता. त्याचाच अप्रत्यक्षपणे संदर्भ सिंह यांनी आपल्या वक्तव्यामध्ये दिला. या आर्थिक भेदभावासंदर्भात आपला लढा असल्याचं सिंह यांना आपल्या वक्तव्यामधून सुचित करायचं होतं. आम आदमी पार्टीने हा व्हीडिओ शेअर केला आहे.

नक्की वाचा >> नऊ लाख शेतकऱ्यांसाठी अच्छे दिन!; काँग्रेस सत्तेत असणाऱ्या ‘या’ राज्याने दिलं कर्जमाफीचं गिफ्ट

नक्की वाचा >> वर्षभरासाठी प्रयोग म्हणून कृषी कायदे लागू करु द्या, शेतकऱ्यांचा फायदा झाला नाही तर… : राजनाथ सिंह

सध्या देशामध्ये शेतकरी आंदोलनावरुन राजकारण तापलेलं आहे. अगदी राज्यांमधील नेत्यांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी ते काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधीपर्यंत सर्वच नेते एकमेकांना या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर टीका टोल्यांमधून टोमणे मारताना दिसत आहेत.