केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरुद्ध आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमांवर मुक्काम ठोकला आहे. कृषी कायद्या एमएसपीचा समावेश करण्याबरोबर सुधारित वीज कायदा रद्द करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात असून, दोन दिवसांपासून शेतकरी दिल्लीत जाण्याचे प्रयत्न करत आहेत. शेतकऱ्यांच्या या आंदोलनावरून पंतप्रधान मोदींना कन्हैया कुमारने सवाल केला आहे.

केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात शेतकरी आंदोलन करत असून, हा मुद्दा देशात चर्चेचा मुद्दा ठरला आहे. यावरून कन्हैय्या कुमारनं पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. “शेतकरी कुठे आपल्याला पंधरा लाख मागत आहेत. ते तर हे पण म्हणत नाहीयेत की, त्यांच्यासाठी साडे आठ कोटी रुपयांचं विमान खरेदी करू द्या. त्यांचं फक्त इतकंच म्हणणं आहे की, कायद्यामध्ये एक ओळ टाका. एमएसपीपेक्षा कमी दराने शेतमालाची खरेदी करणे बेकायदेशीर असेल,” असं म्हणत कन्हैय्या कुमार टीका केली आहे.

केंद्र सरकारनं केलेल्या तीन कृषी कायद्यांना पंजाब, हरयाणातील शेतकऱ्यांकडून प्रचंड विरोध होताना दिसत आहे. महिनाभरापासून पंजाब, हरयाणात आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांनी केंद्राचं लक्ष आपल्या मागण्याकडे वेधून घेण्यासाठी ‘चलो दिल्ली’ची घोषणा देत आंदोलनाची हाक दिली होती. दोन दिवसांपूर्वीच शेतकऱ्यांचे हजारोंच्या संख्येनं जत्थे दिल्लीच्या सीमांवर दाखल झाले आहेत. मात्र, शेतकऱ्यांना सीमांवरच रोखण्यात आलं आहे. यातून पोलीस विरुद्ध शेतकरी असा संघर्षही बघायला मिळत आहे.